उगाव | वार्ताहर Ugaon
उगाव येथे विनता नदीकाठावर सामुदायिक जलसमाधी आंदोलनासाठी आज आलेल्या शेतकर्यांची दखल प्रशासनाने घेतल्याने आणि कैलास भोसले यांनी शिष्टाई केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त हजारोंच्या संख्येने उगाव येथे विनता नदीकाठी जलसमाधीसाठी शेतकरी जमले होते. या जलसमाधी आंदोलनाची प्रशासन व शासनाच्या वतीने दखल घेऊन सरसगट पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या करुन तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा कृषि अधिकार्यांनी देवून आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनाला तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले.
निफाड तालुक्यात मे महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत आहे. टोमॅटो, मका, द्राक्ष व इतर अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षाची खरडछाटणी झाल्यापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे द्राक्षाची काडी तयार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहे. आंदोलनात शेतकरी संघटनांच्या विविध पदाधिकार्यांनी हजेरी लावत या आंदोलनाला पाठिंबा दिला.
जलसमाधी आंदोलनात राज्य द्राक्षबागायतदार संघ विद्यमान अध्यक्ष कैलास भोसले यांचे नेतृत्व व शिष्ठाई फळाला आली. दसर्यासारख्या मोठ्या उत्सवाच्या सणाला आंदोलनकर्त्यांच्या वतीने दुदैवी वा वेगळी घटना घडण्यापासून भोसले यांनी शेतकर्यांना परावृत्त करून निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे, निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव या प्रशासकीय अधिकार्यांच्या मध्यस्थीने उपस्थित शेतकर्यांची समजूत काढली. तसेच भोसले यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा कृषि अधिकारी माने यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकर्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचविल्या.
महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाच्या वतीने सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आदी भागात संघाच्या वतीने द्राक्ष उत्पादकांसाठी जो अहवाल एनआरसीच्या माध्यमातून पाठविला आहे, तोच अहवाल नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी लागू करण्याची मागणी भोसले यांनी कृषिमंत्री दत्तामामा भरणे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने द्राक्ष उत्पादकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी देण्यात आले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिनी विपरित घटना आंदोलनाच्या माध्यमातून रोखता आली व आंदोलन स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मधुकर ढोमसे, दत्तात्रय सुडके, छोटूकाका पानगव्हाणे, साहेबराव ढोमसे, भास्करराव पानगव्हाणे, सोमनाथ पानगव्हाणे, प्रभाकर मापारी, ज्ञानेश्वर पानगव्हाणे, पतिंग ढोमसे, राम मोरे, नंदू राठी, एकनाथ निकम, निवृत्ती कोल्हे, नामदेव पानगव्हाणे, संदिप पानगव्हाणे, मोतीराम कोल्हे, रोहिदास फुगट, अर्जुन ताकाटे, नंदू चव्हाण, किशोर पानगव्हाणे, अब्दुल शेख आदींसह मंडल अधिकारी गोविंद काळे, तलाठी मयूर गिरासे, पोलीस पाटील त्र्यंबके आदींसह शेतकरी उपस्थित होते.




