Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी-पिंपळगाव रस्ता रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध

दिंडोरी-पिंपळगाव रस्ता रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध

भूसंपादन व मोबदला न देता काम सुरू केल्याचा आरोप; ग्रामसभेत नोटीस फेटाळली

- Advertisement -

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

YouTube video player

दिंडोरी – तालुक्यातील पालखेड–लोखंडेवाडी–जोपूळ–पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करत नुकसान भरपाई देण्याची एकमुखी मागणी केली आहे.

पिंपळगाव मार्केट ते त्रंबकेश्वर व्हाया दिंडोरी उमराळे हा रस्ता सिहंस्थ निधीतून होत असून राष्ट्रीय महामार्ग ने त्रंबक जाणाऱ्या भाविकांसाठी हा बायपास बनविण्यात येणार आहे मात्र यासाठी कोणतीही भू संपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. पालखेड लोखंडेवाडी जोपूळ चिंचखेड येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त असून अगोदरच मोठ्या प्रमाणात जमिनी धरण कालव्याला संपादित झाल्या असून अनेक शेतकरी अल्प भूधारक असून संभाव्य रुंदीकरणाने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखेड, लोखंडेवाडी, जोपूळ व चिंचखेड ग्रामपंचायतींना नोटीस बजावून, रस्त्यालगत दुतर्फा २० मीटर अतिक्रमण झाल्याचा दावा केला असून संबंधित अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, थेट शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता ग्रामपंचायतींनाच जबाबदार धरले जात आहे, यावर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस एकमुखाने फेटाळण्यात आली. कोणतेही भूसंपादन न करता अतिक्रमण काढण्याची नोटीस देणे बेकायदेशीर असल्याचा ठाम दावा ग्रामस्थांनी केला.

“रुंदीकरण करायचे असल्यास शासनाने आधी भूसंपादन करून नियमाप्रमाणे मोबदला द्यावा, त्यानंतरच काम करावे,” अशी ठाम भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली.ग्रामसभा ठराव संबंधित विभागास देण्यात आले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांना निवेदन देत, आधी भरपाई द्यावी, तोपर्यंत काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे.

याशिवाय पालखेड–लोखंडेवाडी येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धडक देत आंदोलनात्मक भूमिका घेतली. “भरपाई द्या आणि मगच काम सुरू करा,” असा जोरदार टाहो फोडत बांधकाम शाखेच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

रस्त्याची रचना : आधी आणि आता

पूर्वी : ३.७५ मीटर डांबरी जिल्हा मार्ग

दुतर्फा २ मीटर साईड पट्टी व चारी

आता प्रस्तावित : ७ मीटर डांबरीकरण

दुतर्फा २ मीटर साईड पट्टी

चारी व्यवस्था
एकूण पंधरा मिटर जागेची मागणी तर 20 मिटर दुतरफा अतिक्रमन काढावे अशी ग्रामपंचायतला नोटीस

रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार असली, तरी भूसंपादन न करता थेट काम सुरू करणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबवून योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...