सिन्नर | वार्ताहर Sinnar
निमगाव देवपूर शिवारात शनिवारी (दि. 13) रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याला शेतात ओढून नेत ठार केल्याची घटना घडल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आज (दि. 14) ओझर-शिर्डी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
गेल्या दहा दिवसात सिन्नर तालुक्यात बिबट्याने तीन मुलांवर हल्ले केल्याची घटना घडली असून यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्याच्या विविध भागात बिबट्या सातत्याने दर्शन देत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आठवड्यापूर्वी पंचाळे येथे अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी सात पिंजरे लावले. मात्र, अद्यापपर्यंत हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला नाही.
वन विभागाकडून सातत्याने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून बिबट्याचे वास्तव्य कैद करण्यासाठी रात्रीच्या वेळी थर्मल कॅमेरे उडवण्यात येत आहे. मात्र, या कॅमेर्यांमध्येही बिबट्या दिसून आला नाही. त्यात शनिवारी निमगाव देवपूर शिवारात मजुराच्या दीड वर्षाच्या मुलाला बिबट्याने आजीसमोर उसाच्या शेतात ओढत नेत ठार केले. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाकडून या बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने निष्पाप बळी जात आहे. त्यासाठी आज खडांगळी येथे त्रिफुलीवर संतप्त शेतकऱ्यांनी ओझर शिर्डी राज्यमार्ग रोखला. वनविभागाने तात्काळ या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. जवळपास अर्धा तास शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला होता. यावेळी सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर व सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत जाधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहत शेतकऱ्यांची समजूत घातली.
वनविभागाने सिन्नर, संगमनेर व इगतपुरी येथील 60 हून अधिक अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंचक्रोशीतील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी पारेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. आंदोलनासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यांकडून 25 पोलिसांचे पथक यावेळी नेमण्यात आले होते.




