Friday, November 15, 2024
Homeनाशिकमहावितरणाच्या अतिरिक्त भारनियमनाचा शॉक; सततच्या विज पुरवठा खंडित होण्याने शेतकरी त्रस्त

महावितरणाच्या अतिरिक्त भारनियमनाचा शॉक; सततच्या विज पुरवठा खंडित होण्याने शेतकरी त्रस्त

ओझे | विलास ढाकणे
दिंडोरी तालुक्यात गेल्या सात ते आठ दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातलेला असताना त्यात महावितरण कंपनीकडून अतिरिक्त भारनियमन होत असल्याने फवारणीसाठी सुद्धा शेतकरी वर्गाला पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

परतीच्या जोरदार पावसामुळे पिकांची नुकसान होत आहे. ही पिके वाचविण्यासाठी रासायनिक औषधाची फवारणी करावी लागते, मात्र सकाळी सात वाजताच महावितरण कंपनीकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. सध्या सर्वत्र खरिप हंगाम जोरात चालू आहे. त्यात संवेदनशील समजल्या जाणा-या द्राक्ष पिकानां फवारणी अंत्यत आवश्यकता असते परंतु विजपुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वत्र द्राक्ष बागायतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील जवळ जवळ सर्वच विज उपकेंद्रात अतिरिक्त भार नियमन करण्यात येत आहे. सध्या तालुक्याच्या सर्वच परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता नाही. त्यात सर्वच विज उपकेंद्रावर लोड सुद्धा नाही तरी सुद्धा भारनियमन केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या भारनियमना संदर्भात संबधीत उपकेंद्र, तसेच दिंडोरी व नाशिक कार्यालयातील महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता वरूनच आम्हाला भारनियमनाचा संदेश येतो त्यामुळे भारनियमन करावे लागते. मात्र, यावर वरिष्ठ अधिकारी तोडगा काढण्यास तयार नाही.

त्यात महावितरण कंपनीकडून तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस पडत असतानाही भारनियमन निर्माण केले जाते. त्यामुळेवाडी वस्त्यांवर राहणाऱ्या जनतेचे विजे अभावीमोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिंडोरी तालुका बिबट्यांचे माहेरघर बनल्यामुळे सायंकाळी सहा वाजेपासूनच बिबटे बाहेर पडण्यास सुरुवात होते. अशी सर्व परिस्थिती असताना सुद्धा व महावितरणला वारंवार माहिती दिलेली असताना सुद्धा वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महावितरण कंपनीकडून लवकरात लवकर या भारनियमनवर तोडगा काढला जावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या