Friday, May 24, 2024
Homeनगरभीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसची बंद पडलेल्या टोल नाक्याला धडक

भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसची बंद पडलेल्या टोल नाक्याला धडक

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ टोलनाक्याजवळ विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. दुभाजकाचा अंदाज न आल्याने ही बस जोरदार आदळली. रविवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया क्लासेसची शैक्षणिक सहल घेऊन चाललेली बस (एम एच १४.सी डब्लु ९००६) चालकाला टोल नाक्याच्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने जोरदार आदळली व टोल नाक्याच्या दुभाजकावर गाडी गेली. त्यामुळे बसचे समोरचे चाके तुटून पडले व पुढचे दोन्ही दरवाजे बंद झाले. यावेळी गाडीत १० ते १५ वयोगटातील ४६ मुले मुली होती.

रात्रीची वेळ व लहान मुले असल्याने प्रसंग अतिशय भयावह होता. यावेळी अपघात झाल्यावर मुले मोठ मोठ्यानी रडायला लागली. त्यांना बाहेर काढण्यासाठी पिंपरी निर्मळ येथील युवक महेश वाघे, राजेंद्र घोरपडे, करण कोळगे, सिद्धार्थ घोरपडे, केतन क्षीरसागर, रितिक घोरपडे, रमेश नरोडे, सागर मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यासाठी बसच्या पुढची काच तोडुन, तसेच मागील आपत्कालीन दरवाजा उघडून सर्व विद्यार्थ्याना खाली घेतले. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती होत्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

यावेळी दुभाजकावर बस गेल्याने डिझेलची टाकीही फुटली होती मात्र सुदैवाने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. अपघाताची माहीती मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुरेश पवार, घोडे, नन्हे यांनी घटनास्थळी धाव घेवुन सहकार्य केले. तसेच युवकांनी शिर्डी येथून दुसरी गाडी बोलावली. तोपर्यंत सर्व मुलांसोबत बोलत येथील तरूणांनी त्यांना धीर देत चहा, बिस्किटे, चॉकलेट देत त्यांना समजावले. घाबरलेल्या मुलांना धक्यातुन बाहेर काढण्यासाठी साई बाबा, भारत माता की जय अशा घोषणा देत त्यांना आधार दिला. शिर्डी येथुन दुसरी खाजगी बस आल्यावर सुमारे अडीच तासांनतर त्यांना या दुसऱ्या बसमध्ये बसुन दिले.

टोलनाक्यावरील बंद असलेले लाईट व मोठमोठे खड्डे यामुळे येथे कायमच अपघात होत आहेत. त्यातुन अनेकांना आपले जिवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे या परीसरात लाईटची व्यवस्था करावी व या परीसरातील रस्त्याचीही दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या