शिरूर । तालुका प्रतिनिधी
रामलिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे.
१ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजता शिरूर-रामलिंग रोडवर हॉटेल शिवशाही मिसळ समोर हा अपघात घडला. स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-12/HM-6971) वरून जाणारा चालक प्रशांत परमेश्वर जाधव (रा. रामलिंग, मूळ रा. भडगाव, जि. जळगाव) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित समोरून येणाऱ्या नितीन दौलत जाधव (वय ३५, रा. रामलिंग) यांच्या पल्सर मोटारसायकलला (क्र. MH-12/DU-6526) जबर धडक दिली होती.
या अपघातात नितीन जाधव यांना हातापायासह पोटावर गंभीर दुखापत झाली. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर आरोपी प्रशांत जाधव घटनास्थळावरून फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या अपघाताची फिर्याद शिरूर पोलिस ठाण्यात १४ सप्टेबर रोजी मृताचा भाऊ रविंद्र दौलत जाधव यांनी दिली असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पो. हवा. उमेश भगत हे करत आहेत. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.





