अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शाळेत विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याच्या दाखल गुन्ह्यात दोषी आढळल्याने प्राथमिक शिक्षकाला न्यायालयाने तीन वर्षे सक्त मजुरीची व दंडाची शिक्षा सुनावली. दुसरीकडे, जिल्हा परिषदेनेही या शिक्षकावर बडतर्फीची कारवाई केली आहे. मदन रंगनाथ दिवे असे कारवाई झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर उपाध्यापक म्हणून कार्यरत असताना या शिक्षकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले. याबाबत तक्रार झाल्याने डिसेंबर 2022 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात या शिक्षकाविरोधात भादंवि कलम 354 (अ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
25 डिसेंबर 2022 रोजी या शिक्षकास अटक झाली. त्यामुळे त्या दिवसापासून जिल्हा परिषदेनेही संबंधित शिक्षकास निलंबित केले. दरम्यान, नगर सत्र न्यायालयाने 18 एप्रिल 2024 रोजी निकाल देत शिक्षक मदन दिवे याला पोस्को कायद्याच्या कलम 8 व 12 अंतर्गत सीआरपीसीच्या कलम 235 (2) अन्वये दोषी ठरविले. पोक्सो कायद्याच्या कलम 8 अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने या शिक्षकाला 3 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख दंड, तसेच दंड न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीचा कारावास अशी शिक्षा सुनावली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या शिक्षकाला 26 ऑगस्ट 2024 रोजी सेवेतून बडतर्फ केले आहे.