Wednesday, January 7, 2026
Homeनगरखत विक्रीत शेतकऱ्यांची अडवणूक; अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

खत विक्रीत शेतकऱ्यांची अडवणूक; अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

उंबरे (वार्ताहर)

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील अनेक लहान व अल्पभूधारक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले असून, कृषी सेवा केंद्रांमध्ये होत असलेल्या खत विक्रीतील गैरप्रकारांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर युरिया व इतर आवश्यक खते मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी गेले असता अनेक दुकानदारांकडून एक गोणी युरिया हवी असेल तर त्यासोबत इतर महागडी खते घ्यावी लागतील, अन्यथा खत मिळणार नाही, अशा भाषेत शेतकऱ्यांना ठणकावून सांगितले जात आहे. याहनही गंभीर बाब म्हणजे, काही दुकानदार उघडपणे शेतकऱ्यांना सांगत आहेत की, तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याकडे तक्रार करा, आमचे कोणी काही करू शकत नाही. यामुळे कृषी सेवा केंद्र व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्याचा संशय अधिक बळावत आहे.

YouTube video player

तसेच खत मिळत नसल्याने एखाद्या शेतकऱ्याने तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित दुकानदारांकडून त्या शेतकऱ्याला पुन्हा खत न देण्याचा प्रकार घडत आहे. अशा शेतकऱ्याला एकाकी पाडून मानसिक व आर्थिक अडचणीत आणले जात असल्याचेही बोलले जात आहे. परिणामी अनेक शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खत न देता दुकानदार आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या नावावर खत विक्री दाखवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. म्हणजेच खताची चोरी करायची, मात्र कागदोपत्री साठा व विक्री रेकॉर्ड पूर्ण ठेवायचा, हा सध्याचा फंडा वांबोरीतील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर दैनिक सार्वमत मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधित अधिकाऱ्यांची खडबडून झोप उडाली असल्याचे बोलले जात आहे.

मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी काही अधिकाऱ्यांनी दुकानदारांना तोंडी सूचना देत ‘दोन-तीन दिवसांत साठा व रेकॉर्ड पूर्ण करा’ असे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नव्हे तर, तपासणीसाठी येताना शेतकऱ्यांच्या नावावर युरियाची विक्री दाखवा, कुठलीही कमतरता ठेवू नका, असा सल्ला दिल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. खताचे दुकाने शेतकऱ्यांसाठी असून, अधिकारी हे शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळतात की नाही याची देखरेख करण्यासाठी असतात. मात्र जर अधिकारीच कृषी सेवा केंद्रांच्या बाजूने उभे राहत असतील, तर सर्वसामान्य शेतकरी तक्रार कोणाकडे करणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

आज वांबोरी परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात युरिया नेमका कोणी घेतला? कोणत्या दुकानदाराने तो दिला? याचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. ट्रॉलीने जाणारा युरिया कोणाच्या शेतात गेला, हा खरा संशोधनाचा विषय असून, त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व कृषी सेवा केंद्रांचे अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळे तत्काळ कारवाई होणार नाही, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. मात्र जर वरिष्ठ अधिकारी खरोखरच निष्ठावंत असतील, तर दोषी कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता खरोखरच कारवाई होणार की, पुन्हा सगळे प्रकरण थंडावणार, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....