Tuesday, July 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजFIFA World Cup 2026:१६ वर्षानंतर स्पेनने रचला ईतिहास! अर्जेंटिनावर १-० ने विजय...

FIFA World Cup 2026:१६ वर्षानंतर स्पेनने रचला ईतिहास! अर्जेंटिनावर १-० ने विजय मिळवत फिफा विश्वषचकावर कोरलं नाव; मेस्सीचे स्वप्न भंगलं

मुंबई | Mumbai
जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करत इतिहास रचला. अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक खेळाने रंगलेल्या या सामन्यात नियमित ९० मिनिटांत एकही गोल झाला नाही. मात्र अतिरिक्त वेळेच्या १०६व्या मिनिटाला बदली खेळाडू फेरान टोरेसने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्पेनने दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.

स्पेनने बलाढ्य अर्जेन्टिनाला हरवून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले. अमेरिकेच्या न्यूजर्सीतील मेटलाईफ स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेन्टिनाला १-० अशा फरकाने मात दिली.

- Advertisement -

स्पेनचे वर्चस्व अर्जेंटिनाचा बचाव भक्कम
सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनने चेंडूवरील नियंत्रण राखत आक्रमक खेळ केला. लामिन यामाल, दानी ओल्मो, फॅबियन रुईझ आणि रोड्री यांच्या प्रभावी खेळामुळे स्पेनने सातत्याने अर्जेंटिनाच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. मात्र अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ याने एकापाठोपाठ एक अप्रतिम बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. स्पेनकडून वारंवार हल्ले होत असतानाही अर्जेंटिनाने संयमी बचाव करत सामना गोलशून्य ठेवला.

संपादकीय : २० जुलै २०२६ – इस्रो समोरील नवे आव्हान!

मेस्सीला संधी मिळाली नाही
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि ज्युलियन आल्वारेझ यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. मात्र स्पेनच्या भक्कम बचावामुळे अर्जेंटिनाला प्रभावी आक्रमण उभारता आले नाही. रोड्रीच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश मध्यफळीने मेस्सीला फारशी मोकळीक दिली नाही. परिणामी अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ पूर्णपणे निष्प्रभ ठरला. अंतिम सामन्यात नियमित वेळेत अर्जेंटिनाला एकही प्रभावी प्रयत्न करता आला नाही.

एन्झो फर्नांडेझच्या लाल कार्डने कलाटणी
नियमित वेळ संपत असताना अर्जेंटिनाला मोठा धक्का बसला. मधल्या फळीतील खेळाडू एन्झो फर्नांडेझला दुसरे येलो कार्ड मिळाल्याने पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवले. त्यामुळे अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला दहा खेळाडूंवर खेळावे लागले. या संख्यात्मक फायद्याचा स्पेनने पुरेपूर लाभ घेतला आणि अर्जेंटिनावर सतत दबाव कायम ठेवला.

फेरान टोरेसचा सुवर्णक्षण
अतिरिक्त वेळेच्या १०६व्या मिनिटाला निको विल्यम्सने उजव्या बाजूने केलेल्या पासवर फेरान टोरेसने अचूक फिनिश करत शानदार गोल केला. हा गोल अखेर निर्णायक ठरला. गोल झाल्यानंतर अर्जेंटिनाने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र स्पेनच्या शिस्तबद्ध बचावामुळे त्यांना यश मिळाले नाही. सामना संपल्याचे घोषित होताच स्पॅनिश खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

मेस्सीला भावना अनावर
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अर्जेन्टिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी कमालीचा भावूक झालेला दिसला. लिओनेल मेस्सीसाठी हा बहुधा अखेरचा विश्वचषक सामना ठरला. सलग दुसरे विश्वविजेतेपद मिळवण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न अपूर्णच राहिले. मेस्सी भावूक झाल्याचे दृश्य जगभरातील चाहत्यांसाठी हळवे करणारे ठरले. अर्जेंटिनाचा पराभव झाला असला तरी संपूर्ण स्पर्धेतील त्यांच्या लढाऊ कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

चाहत्यांचे सेलिब्रेशन
स्पेनच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर राजधानी माद्रिदमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी हजारो चाहते स्पॅनिश ध्वज घेऊन माद्रिदच्या सिबेलेस स्क्वेअर इथे एकत्र जमले होते. त्यांनी विजयी जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून सोडला. माद्रिदसह बार्सिलोना, सेव्हिया आणि इतर शहरांमध्येही चाहत्यांनी रस्त्यावर उतरून स्पेनच्या दुसऱ्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा 65 टक्के भरले

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून धिम्या गतीने का होईना नवीन पाण्याची धरणात आवक होत...