मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजले आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली येथे घेतलेल्या सभेत दिवंगत नेते आर.आर.पाटील (R.R. Patil) यांच्यावर टीका केली. सिंचन घोटाळ्यावरून तेव्हाचे गृहमंत्री आर आर यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे.
याचदरम्यान शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले, आबांचे केस फार लहान होते ते केसांनी गळा कापू शकत नाहीत. ते अत्यंत कर्तबगार असे राज्याचे गृहमंत्री होते. गृहमंत्री म्हणून त्यांनी कधी चुकीचं काम केलं असंही आम्हाला वाटत नाही. अजित पवारांनी काल आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
तसेच, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेची जी शपथ घेतली आहे, त्या व्यक्तीने अशा पद्धतीने गोपनीयतेचा भंग करणे हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजेत. तुम्ही जनतेसमोर या गोष्टी कशा काय दाखवू शकता? अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात काही राजकीय पक्ष आहेत. ज्यांचे मुख्य अन्न हे सुपारी आहे. ते सुपारीवरच जगतात. अशा पक्षांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पाडण्याची सुपारी घेतली आहे. अशा पक्षांनाही या निवडणुकीत जनता जागा दाखवेल असंही ते म्हणाले. दरम्यान शेकापबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. रायगडमधील काही जागा त्यांना देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असंही यावेळी राऊत म्हणाले. आघाडीत कोणीही बंडखोरी केलेली नाही. पर्यायी उमेदवार उभे राहीले आहेत. ते आपली उमेदवारी मागे घेतली असेही राऊत म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले ?
भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. त्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. आणि चौकशी करण्यासाठी फाइल तयार करण्यात आली. त्या फाइलवर आर. आर. आबांनी सही केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.