मुंबई | Mumbai
बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे गुरुवारी आज निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. यकृतासंबंधित समस्यांमुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पहलाज निहलानी हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव मानले जात होते. त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. विशेषतः अभिनेता गोविंदा आणि चंकी पांडे यांना चित्रपटसृष्टीत मोठी संधी देण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. ‘आंखें’, ‘शोला और शबनम’, ‘अंदाज’, ‘तलाश’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
त्यांच्या कार्यकाळात अनेक चित्रपटांच्या सेन्सॉरशिपवरून मोठे वाद निर्माण झाले होते. विशेषतः ‘उडता पंजाब’ चित्रपटावर सुचवलेल्या कात्रणांमुळे ते चर्चेत आले होते. पहलाज निहलानी हे असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्सचे २९ वर्ष अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. तसेच, २०१५ मध्ये त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपटांमधील अश्लीलता, अपशब्द आणि हिंसाचारावर त्यांनी कठोर भूमिका घेतली होती.
चित्रपट निर्मितीसोबतच निहलानी यांनी अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. 2008 मध्ये त्यांनी हल्लाबोल या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. तसेच, 2012 मध्ये त्यांनी अवतार या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तसेच, 2014 च्या लोकसभा निवडणुकांआधी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ हे प्रचारगीत तयार केल्यामुळे निहलानी चर्चेत आले होते.
पहलाज निहलानी यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार, निर्माते आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेल्या योगदानाची कायम आठवण राहील, अशा भावना अनेकांकडून व्यक्त होत आहेत.




