Thursday, June 20, 2024
Homeब्लॉगशोध घ्या स्वत:चा

शोध घ्या स्वत:चा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

- Advertisement -

आपल्या खेळातील चार टप्पे आपण पूर्ण केले आहेत. आता खेळाच्या पाचव्या टप्प्याकडे वळण्यापूर्वी तुमच्या व तुमच्या पालकांच्या मनात या खेळाविषयी ज्या काही शंका उपस्थित झाल्या आहेत त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया! अर्थात, खेळाचा मध्यंतर पाहूया! खेळाच्या मध्यंतरापर्यंत खेळलेल्या खेळातून नेमके काय साध्य केले? आणि खेळ खेळताना नेमकी कोणती चूक होत असते हे जाणून घेण्यासाठीच खेळात मध्यंतर असणे आवश्यक असते. खेळताना कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यायचे आणि करिअरचा खेळ कशाप्रकारे यशस्वी करायचा आहे ते पाहूया. आता तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न की, आपल्या आवडीनिवडी लिहून काय होणार? आवडीनिवडीतून करिअर थोडीच करता येणार आणि जरी केले तरी आपल्याला यश मिळेलच हे कशावरून?

चला तर मग आज आपण याच प्रश्नांची उकल करूया. स्वतःची आवड ओळखणे हे पाहिजे तितके सोपे काम नव्हे, कारण बर्‍याच वेळा आपल्याला एकाच वेळी खूप गोष्टी कराव्याशा वाटतात. मग अशावेळेस आपल्या मनाचा खूप गोंधळ होतो आणि नेमके काय करावे, तेच सुचेनासे होते. उदाहरणच घेऊन समजायचे झाल्यास, तुम्हांला गृहपाठ करताना गल्लीतल्या किंवा कॉलनीतल्या मुला-मुलींचा गोंगाट ऐकून घराबाहेर जावेसे वाटते आणि गल्लीतल्या किंवा कॉलनीतल्या मुला-मुलींबरोबर बाहेर खेळावेसेही वाटते. घरात कोणी टीव्ही पाहत असेल तर टीव्ही पाहावासा वाटतो. दुरून कुठून बासरीचे सूर ऐकू आलेत तर बासरी वाजवावीशी वाटते. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून तुमची आवड आणि त्या आवडीतून करिअरची निवड करणे महत्त्वाचे असते. त्यासाठीच आपण हा आवड-निवड ओळखण्याचा खेळ खेळत आहोत. मुलांनो, आता तुमच्या लक्षात आले असेलच. चला तर मग आता तुमच्यासारख्याच गोंधळलेल्या सोनी नावाच्या विद्यार्थिनीला दहावीनंतर आर्टस् फॅकल्टीत प्रवेश घेऊन करिअर करण्याची इच्छा आहे. तिला पत्रातून केलेले मार्गदर्शन तुम्हांलाही उपयोगी पडू शकते.

चि. सोनीस, शुभाशीर्वाद.

सोनी, तुला आर्टस् फॅकल्टीत प्रवेश घ्यायचा आहे. हे वाचून काहीजणांना आश्चर्य वाटले असेल, कारण आर्टस् फॅकल्टीत प्रवेश घेतल्यावर करिअरच्या संधी फारच मर्यादित असतात, असा अनेकांचा समज असतो; परंतु असे काहीही नाही. आर्टस्मध्ये पदवी घेऊनही उत्तम करिअर करता येते.

त्यासाठी मातृभाषेचा सखोल अभ्यास करावा. मातृभाषेच्या अभ्यासाबरोबरच हिंदी, उर्दू, इंग्रजी, फ्रेंच, जर्मनी अशा अनेक भाषांपैकी दुसर्‍या एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास शिक्षक, प्राध्यापक, अनुवादक, नाटककार, पटकथा, लेखक, कॉपीराईटर, डबिंग, रेडिओ जॉकी, प्रकाशक, निवेदक, संपादक, पत्रकार, वार्ताहर इ. अशा अनेक क्षेत्रात आपापल्या आवडीनुसार करिअर करता येते. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरतादेखील आर्टस् फॅकल्टीत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त करत असतात. पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देऊन सनदी अधिकारी होत असतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. नियमितपणे पुस्तकांचे व वृत्तपत्रांचे वाचन करावे. ‘गोष्टी माणसांच्या,’ ‘माती, पंख आणि आकाश’, ‘आमचा बाप अन् आम्ही,’ ‘एक होता कार्व्हर’ यांसारखी पुस्तके वाचावीत. कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याकरता जिद्द, चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यश नक्कीच मिळणार, यात शंकाच नाही. तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

तुझी,

ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या