दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपल्या खेळात आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांचे डोके खाल्ले. आता आपण आपल्या ओळखीतील काही सदस्यांचे डोके खाऊया! शब्दांची पण काय मज्जा आहे ना! आतापर्यंत आपण खाद्यपदार्थ खात होतो आणि आज तर चक्क शरीराचा महत्त्वाचा अवयव म्हणजे ‘डोके’च खाल्ले. आहे ना गंमत शब्दांची! विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, दिवसभरात आपण हजारो शब्द बोलतो, पण शब्दांच्या वैविध्यांकडे कधी बारकाईने पाहतो का? विचार करतो का? नाही ना! मग आजपासून शब्दांशी खेळायला शिकायचे. कदाचित यातूनच तुम्हांला तुमची करिअरची वाटही गवसू शकते.
चला तर मग, आज आपण खेळात तुमच्या जवळच्या खास व्यक्तीला सहभागी करून घेऊया. ज्यांच्याबरोबर तुम्ही धम्माल करतात, मस्ती करतात, त्या तुमच्या जवळच्या मित्राला खेळायचे थांबवून त्याला तुमच्या आवडींविषयी लिहायला सांगायचे आहे. एका कोर्या कागदावर समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणाच्या बाजूने कमीत कमी तुम्हांला आवडणार्या तीन गोष्टी लिहायला सांगायचे किंवा जास्तीत जास्त सहा गोष्टी तुमच्या मित्राला लिहायला सांगायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी समद्विभुज त्रिकोणच का काढायला सांगितला? विद्यार्थ्यांनो, भाषेवर प्रभुत्व असले तर प्रत्येक विषय समजण्यास खूप सोपे जाते. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल, गणित आणि भाषेचा काय संबंध! मुलांनो, संबंध आहे. सम म्हणजे सारखा, समान. द्वि म्हणजे दोन. भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्याच लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. तसेच समान बाजूंनी केलेले कोनही समानच असतात. उदा. त्रिकोणाचे दोन कोन पन्नास अंश (50ओ), पन्नास अंश (50ओ) असे असल्यास त्या कोनाच्या बाजूही समान लांबीच्या असतात आणि त्या त्रिकोणाचा तिसरा कोन हा 80 अंशाचा (80ओ) असतो. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. 180 – (50+50) = 80ओ असते. चला खेळता खेळता गणिताची उजळणी झाली. आता आपण एका करिअरविषयी जाणून घेऊया.
चि. समीरास,
शुभाशीर्वाद.
समीरा, तुला डबिंग आर्टिस्ट बनायचे आहे. हे ऐकून आनंद झाला. तू एका वेगळ्या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करत आहेस त्याचे कौतुक वाटले. डबिंग आर्टिस्ट किंवा व्हॉईस ओवर आर्टिस्टमध्ये करिअर करण्याकरता आपल्या आजूबाजूला बोलत असणार्या व्यक्तींचे बोलणे सजगतेने ऐकण्याची सवय करावी. टीव्ही कलाकार, चित्रपटातील कलाकारांच्या संवादांचा बारकाईने अभ्यास करावा. गर्दीच्या ठिकाणी ऐकायला येणारे वेगवेगळ्या भाषेतील, शैलीतील आवाज टिपण्याची सवय करावी. मास कम्युनिकेशन, अॅक्टिंग, व्हॉईस ओवर, डबिंग कोर्स करून डबिंग आर्टिस्ट बनणे सहज शक्य होईल. बर्याच वेळा डबिंग आर्टिस्ट अभिनय, मिमिक्री, रेडिओ जॉकी, अँकरिंग इ. क्षेत्रातही करिअर करत असतात. त्यामुळे डबिंग आर्टिस्ट या क्षेत्रात खूप वाव आहे. आज डबिंग आर्टिस्ट या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.
तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
तुझी, ताई