जाकीर शेख | घोटी
मुंढेगाव परिसरात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री लागलेली भीषण अजुनही धुमसत आहे. आग 20 अग्नीशमन दलाचे 20 बंबांच्या अनेक फेर्यांनी पाणी मारूनही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र कंपनीच्या आगीला 40 तास उलटून देखील आग नियंत्रणात आलेली नाही. कंपनीतील ज्वलनशील टाक्या फुटण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनी परिसरातील तीन किमी परिघातील गावे, व्यावसायिक आस्थापना निर्मनुष्य केली.त्याचबरोबर परिसरात जमावबंदी केली. त्यामुळे परिसरातील गावे सामसुम झाली आहेत.
कंपनीतील मेटालायझर युनिट 1,2,3 आणि पॉलिस्टर लाईन पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिल्म्स आणि पीव्हीसी मटेरियल हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढतच जात असल्याचे सांगितले जात आहे. आग विझवण्यासाठी नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातून अग्नीशमन दलाच्या 20 गाड्या कार्यरत होत्या. तसेच आपत्ती व्यवस्थापन टिम घटनास्थळी दाखल झाली असून फोम आणि पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर आकाशात आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असून आगीची तीव्रता वाढतच आहे.
जिंदाल पॉलीफिल्म कंपनीच्या लागलेल्या आगीला 40 तास उलटून गेले तरी आग आटोक्यात आलेली नाही.कंपनीच्या आतमध्ये असलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाल्यास पंधरा किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित होण्याची शक्यता वर्तवल्याने परिसरातील गावे, कंपन्या, शाळा आणि परिसर निर्मनुष्य करण्याच्या प्रशासनाने सूचना देण्यात आल्या आहेत. अजूनही ही आग दोन ते तीन दिवस अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत असून प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. या भीषण घटनेने या कंपनीत काम करणारे तीन ते साडेतीन हजार परप्रांतीय कामगारांना कंपनीने कालच बाहेर काढल्याने या कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. मिळेल त्या वाहनाने हे कामगार आपल्या मुळ गावी परततना दिसत असून इगतपुरी रेल्वे स्थानकावर आता या कामगारांची गर्दी दिसत होती. दोन दिवसांपासून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आगीची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न
कंपनी पॉलिफिल्म बनवते त्यासाठी लागणार कच्चा माल अत्यंत ज्वलनशील असून त्याची आग लिक्विड होऊन पसरते. पाण्याने आग विझत नाही त्यासाठी फोम लागतो. पुणे, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या टीम आल्या. जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी प्रोपेन टँक आहे त्यात लिक्विड गॅस असून तो टँक फिक्स असल्याने हलविता येत नाही. हा टँक आगीपासून तो 50 ते 60 मीटर दूर आहे. टँकच्या बाजूला धरणातील गाळ टाकून थंडावा निर्माण केला जात असुन लोकांचा जीव वाचविणे ही आमची प्राथमिकता आहे. जरी टँकला आग लागली तरी सेफ्टी वॉल आहेत त्यामुळे टँक फूटण्याची शक्यता कमी आहे. जरी तसे झाले तरीही त्याची तीव्रता कमी करण्याचे काम सुरू असुन स्फोट झाला तर त्याच्या धमाकामुळे घराच्या काचा फुटू शकतात. लोकांना इजा पोहचू शकते म्हणून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. आग विझविण्यासाठी कोणत्याच साधनांची कमतरता नसून इतर जिल्ह्यातून चांगले सहकार्य मिळत आहे .
– जलज शर्मा , जिल्हाधिकारी