घोटी । जाकीर शेख Ghoti
जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री १ वाजता आग लागली. आग विझवण्यासाठी प्रशासानाकडून अथक प्रयत्न करण्यात आले मात्र १६ तासांपासून लागलेली आग अद्याप पर्यंत आटोक्यात आली नाही.
आज सकाळी थोड्या फार प्रमाणात आग आटोक्यात आली होती. मात्र सायंकाळी या आगीने पुन्हा रौद्ररूप घेतले. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेला १६ तास उलटून देखील आगीची धग कायम आहे . १५ पेक्षा अधिक अग्निशमन दलाची वाहन सातत्याने गेल्या १६ तासापासून पाण्याचा आणि फोमचा मारा करत आहे. पण परिसरात असलेला कच्चामाल आणि ज्वलनशील पदार्थ त्याचबरोबर प्लास्टिकमुळे ही आग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आगी बरोबरच स्फोटांच्या आवाजामुळे देखील परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिंदाल कंपनीची आग वेगाने वाढत असल्याचे पाहुन खबरदारीचा उपाय म्हणून कंपनी परिसर खाली करण्यात येऊन सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे . या कंपनीत हजारो परप्रांतीय कामगार असून त्यांना बाहेर काढल्यामुळे मिळेल त्या गाडीने कामगार गावाकडे परतत असताना दिसुन आले.
नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अग्नीशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. रात्री लागलेली आग दोन वेळा कमी झाली मात्र ती पुन्हा भडकली. रात्री उशिरा पर्यंत १५ ते १६ अग्नीशमन दलाचे बंब कंपनीत युद्ध पातळीवर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.