पुणे । Pune
गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या दुर्मीळ आजाराने पुण्यात थैमान घातले असून, या आजाराचा पहिला बळी गेल्याचे समोर आल आहे. पुण्यात या आजाराची लागण झालेल्या रुग्णाचा २५ जानेवारी रोजी सोलापूरमधील एका रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
मृत रुग्ण सनदी लेखापाल म्हणून एका खासगी कंपनीत कार्यरत होता आणि तो पुण्यातील डीएसके विश्व धायरी परिसरामध्ये राहण्यास होता. ११ जानेवारी रोजी त्यांना पुण्यात जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. काही कामानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले होते. मात्र, सोलापूरला गेल्यानंतर त्यांचा अशक्तपणा वाढल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांचा मृत्यू झाला.
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा प्रतिकारशक्ती प्रणालीच्या बिघाडामुळे मज्जासंस्था आणि स्नायूंवर परिणाम करणारा दुर्मीळ आजार आहे. हातपाय कमकुवत होणे, हालचालींवर नियंत्रण गमावणे आणि थकवा ही याची लक्षणे आहेत. हा आजार योग्य वेळी निदान न झाल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये या आजाराची लागण झालेल्या २२ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभाग आणि रुग्णालये या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वच्छता आणि योग्य आहारावर भर देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.