नवी दिल्ली । दि. 23 प्रतिनिधी/वृत्तसंस्था
संसदेचे अधिवेशन आज दि.24 जून २०२४, सोमवारपासून सुरू होत आहे. अठराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर 26 जूनला लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. 27 जूनला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील. एनडीए सरकारसाठी सुरू होणारे नव्या लोकसभेचे सत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारची कसोटी घेणार ठरणार आहे. सरकारकडे साधे बहुमत असले तरी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सरकारच्या संख्याबळाचा कस लागणार आहे. विरोधी बाकावरील इंडिया आघाडी सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून सर्वप्रथम शपथ घेतील. पंतप्रधान मोदींनतर राजनाथ सिंह, अमित शहा, आणि नितीन गडकरी शपथ घेतील. यानंतर मंत्री परिषदेचे इतर सदस्य खासदार म्हणून शपथ घेतील. पहिल्या दिवशी एकूण 280 खासदार शपथ घेतील. त्यात महाराष्ट्रातील 14 खासदारांचा समावेश असेल. दुसर्या दिवशी महाराष्ट्रातील उर्वरित 34 खासदार घेणार शपथ घेतील. हंगामी अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) भर्तृहरी महताब त्यांना शपथ देतील. त्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात येईल. मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांपैकी 58 जण लोकसभेचे सदस्य आहेत. 13 मंत्री राज्यसभेचे खासदार आहेत. मंत्री रवनीत सिंग बिट्टू हे मात्र दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. आताच्या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास नसेल.
अठराव्या लोकसभेचे कामकाज 9 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीपासून सुरू झाले. पहिले अधिवेशन उद्यापासून (दि.24) सुरू होत ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे. 10 दिवसांत 29-30 जूनच्या सुट्या वगळता एकूण 8 बैठका होतील. सर्वप्रथम हंगामी अध्यक्ष भृतूहरी महताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील. त्यानंतर ते सकाळी 11 वाजता लोकसभेत पोहोचतील. पहिले दोन दिवस हंगामी अध्यक्ष नव्या सदस्यांना शपथ देतील. त्यानंतर 26 जूनला लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होईल. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करतील. अधिवेशनाच्या शेवटचे दोन दिवस सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार आहे. त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. दहा वर्षांनंतर प्रथमच पंतप्रधान मोदींना यावेळच्या अधिवेशनात तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या नीट परीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमिततेच्या आरोपांवरून विरोधक अधिवेशनात गदारोळ करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात आभार प्रस्तावावर चर्चा होईल. नीट परीक्षेतील अनियमितता, यूजीसी नेट परीक्षा रद्द आणि अग्निवीर योजना आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या पवित्र्यात आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत झालेल्या चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देतील.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 17 व्या लोकसभेच्या तुलनेत 40 दिवसांनी कमी आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी 30 मेस पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 17 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. मात्र त्यात नव्या सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी 9 जूनला शपथ घेतली व पहिले अधिवेशन 15 दिवसांनी सुरू होत आहेे.
हंगामी अध्यक्षपदावरून मतभेद
ओडिशातील 7 वेळा खासदार असलेले भाजपचे भृतूहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 8 वेळचे खासदार असलेले कोडीकुन्नील सुरेश यांना हंगामी अध्यक्षपदी नेमण्याची मागणी काँग्रेसने केली होती. मात्र काँग्रेसची ही मागणी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळली आहे. काँग्रेस खासदार सुरेश हे सलग जिंकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठतेला कोणताही आधार नाही, असे रिजिजू म्हणाले. हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी राष्ट्रपतींनी पीठासीन अधिकारी म्हणून 5 खासदारांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी के. सुरेश (काँग्रेस), सुदीप बंदोपाध्याय (टीएमसी), टीआर बालू (डीएमके) तसेच भाजपकडून राधामोहन सिंग, फगन सिंग कुलस्ते यांच्या नावांचा समावेश आहे. हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीचा निषेध म्हणून इंडिया आघाडीच्या तिन्ही खासदारांनी 22 जूनला आपली नावे मागे घेतली आहेत.
विरोधक मजबूत स्थितीत
2014 आणि 2019 च्या तुलनेत यावेळी भाजपकडे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे अठराव्या लोकसभेत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. एनडीएचे 293 खासदार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आधीच्या दोन कारकिर्दींच्या तुलनेत यावेळी तिसर्या कारकिर्दीत विरोधी पक्ष मजबूत झाले आहेत. इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसकडे 99 जागा असून भाजपनंतर सभागृहातील तो दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसने जागांचे शतक पूर्ण केले आहे.
काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्या 10 वर्षांपासून रिक्त आहे. कारण 2014 पासून कॉग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाचे 54 खासदार निवडून आले नव्हते. यावेळी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने 99 जागा जिंकल्या असून 3 अपक्षांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 102 वर पोहोचले आहे. साहजिकच लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येणार आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी विरोधी पक्षाचे लोकसभेच्या एकूण 543 खासदारांपैकी 10 टक्के म्हणजेच 54 खासदार असणे आवश्यक आहेत.