अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जमिनीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून पाच जणांनी मिळून दोन सख्ख्या बहिणींना डोंगरावरील माळरानावर मारहाण केल्याची घटना गुरूवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी घडली. यावेळी संशयितांनी एका दिव्यांग युवतीचे कपडे फाडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १८ वर्षीय दिव्यांग युवतीने दिलेल्या जबाबावरून राहुल छोट्या काळे, तुकाराम झेंड्या चव्हाण, योगेश रितेश चव्हाण, दुर्गेश रितेश चव्हाण, रितेश पोपट चव्हाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. फिर्यादी शहराजवळील डोंगरावर आपल्या बहिणीसोबत बकऱ्या चारण्यासाठी गेली असता हा प्रसंग ओढवला. पीडित फिर्यादी युवतीच्या वडिलांशी संशयित आरोपींचा जमिनीवरून जुना वाद असून, तिचे वडील सध्या तुरूंगात आहेत. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या तारखेला गेल्याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुरूवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पीडिता आणि तिची बहीण बकऱ्या चारत असताना संशयित आरोपींनी अचानक तेथे येऊन दोघींना मारहाण करण्यास सुरूवात केली. पीडितेची बहीण कशीबशी निसटून गेली, मात्र दिव्यांग असल्यामुळे पीडितेला पळता आले नाही. संशयित आरोपींनी तिला खाली पाडून मारहाण केली व तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. यानंतर पीडितेला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




