एक व्हीडिओ समाजमाध्यमांवर नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भारतीय सैनिक एका रेल्वेला धक्का मारतानाचे चित्रीकरण त्यात आहे. त्या घटनेचा माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वर्णनाचा गोषवारा असा… हैद्राबादला जात असलेल्या फलकनुमा एक्सप्रेसच्या पाच डब्यांना आग लागली. गाडीत काही भारतीय जवानदेखील प्रवास करत असावेत, असे ते चित्रीकरण बघताना जाणवते. आग पूर्ण गाडीत पसरू नये म्हणून जवानांनी पुढाकार घेतला.
धक्के मारून आग लागलेले डबे वेगळे केले. प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनीदेखील त्यांना मदत केली. जवान आणि लोकांनी केलेल्या स्वयंस्फूर्त मदतीने शेकडो प्रवाशांचा जीव वाचला. संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली नाही. अशा सामाजिक जागरूकतेची समाजाला कधी नव्हे इतकी आज गरज आहे, असे म्हटले तर वावगे ठरेल का? गुन्हेगारी वाढत आहे. क्षुल्लक कारणांवरून माणसे एकमेकांचा जीव घेत आहेत. अडनिड्या वयातील मुलांमध्ये आक्रमकता वाढत आहे. महिला स्वतःला असुरक्षित मानत आहेत. मुलींना घराबाहेर पडण्यासाठी पालक नाईलाजाने परवानगी देतात. मुलगी सुरक्षित घरी परत येईल ना, हीच चिंता त्यांना सतावते. रस्ते अपघात आणि त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा प्रसंगांतील, घटनांमधील गरजूंना तातडीच्या मदतीची गरज भासते. लोकांचा मदतीचा हात अपघातामधील जखमींचे जीव वाचवू शकतो. अपघाती मृत्यूही टाळू शकतो. मुलींना सुरक्षित वातावरण देऊ शकतो. अडनिड्या वयातील मुलांचे सामाजिक पालकत्व लोकांनी स्वीकारले तर त्याचे अनेक फायदे संभवतात. मुलांचे चुकीचे सामाजिक वर्तन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवले जाऊ शकते. त्यांना प्रसंगी जाब विचारला जाऊ शकतो. मुलींना भर रस्त्यात छेडणाऱ्यांना जरब बसू शकते. नियमांना हरताळ फासण्यालाच युवा पिढीला हिरोगिरी वाटते. त्यांना नियमांचे महत्व सांगता येऊ शकेल, पण तसे घडण्यासाठी बघ्याची भूमिका स्वीकारून गप्प बसणे त्यगावे लागेल. ‘मला काय करायचे?’, ‘माझे कोणी नाही ना’, ‘मी एकट्याने करून काय होणार आहे?,’मीच का करू?’ अशी कोती मनोवृत्ती बदलावी लागेल. दुर्दैवी वेळ कधीही आणि कोणवरही येऊ शकते हे विसरून कसे चालेल? वैयक्तिक पातळीवर अशा प्रसंगांमध्ये लोकांनी मदत करावी याची अपेक्षा असते. तथापि इतरांवर प्रसंग गुदरल्यावर मात्र माणसे बघे होत असावीत का? हैद्राबाद घटनेतील माणसांनी अशीच भूमिका स्वीकारली असती तर शेकडो लोकांचे जीव आणि गाडी वाचली असती का? यंत्रणेचा आणि सरकारी त्रास टाळण्यासाठी माणसे, विशेषतः अपघातात जखमींना मदत करण्याचे टाळतात. तथाकथीत दादा आणि भाईच्या दहशतीला घाबरतात. मुलींना छेडणाऱ्यांना हटकायची हिंमत करत नाहीत. तथापि दुसऱ्या कोणीतरी पुढाकार घेतला तर माणसे त्यांच्या मागे बळ उभे करतात. गर्दीचा चेहरा घेऊन मदतकार्यात सहभागी होण्याची मानसिकता सर्वत्र आढळते. हैद्राबाद घटनेतदेखील कदाचित तसेच घडले असावे. मदत करणारे एकांडे शिलेदारसुद्धा असतात. अनेक सामजिक संस्था कार्य करतात, पण मनुष्यबळाअभावी अनेक संस्थांची कामे पूर्ण होत नाहीत. काही संस्था बंद पडतात. अशा सर्वांच्या समाज पाठबळ उभे करू शकतात. ‘साथी हात बढाना…’ यालाच म्हणत असावेत.