Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याध्वजारोहणाचा महाजनांना मान; राजकीय चर्चांना उधाण

ध्वजारोहणाचा महाजनांना मान; राजकीय चर्चांना उधाण

नाशिक । फारुक पठाण Nashik

विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या गटाने राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला पाठिंबा देऊन थेट नऊ मंत्र्यांसह स्वत: उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून राज्याचे डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिनचे झाले आहे.

- Advertisement -

मात्र यानंतर अंतर्गत वादविवाददेखील वाढल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. याचाच एक भाग म्हणून काही ठिकाणी पालकमंत्र्यांऐवजी इतर मंत्र्यांवर ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आल्याने पुन्हा कुरबूर सुरू झाल्याचे चित्र आहे.पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांच्याकडे जबाबदारी असताना थेट मंत्री गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

स्वातंत्र्यदिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. मात्र आतापर्यंत अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली नाही. तर काही मंत्र्यांवर एकापेक्षा जास्त जिल्ह्यांची पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार, असा प्रश्न मागील काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. मात्र यावर राज्य सरकारने मधला मार्ग काढून ध्वजारोहण करणार्‍या मंत्र्यांची स्वतंत्र यादी जाहीर केली आहे. मात्र त्यावरून देखील काही प्रमाणात वाद झाल्याच्या चर्चा आहेत. राज्य सरकारने

पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठीच तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केल्याचे देखील बोलले जात आहे. तर काही ठिकाणी जिल्हाधिकारीच ध्वजारोहन करणार आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नाशिकची जबाबदारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आली. तर विद्यमान पालकमंत्री दादा भुसे हे धुळ्यात जाणार आहे. तर नाशिकचे दुसरे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना थेट अमरावती येथे पाठविण्यात आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. येत्या मंगळवारी 15 ऑगस्टला आपण देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. यावेळी महाराष्ट्रासह देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळा होतो. यावेळी देशभक्तीपर गीते, भाषण ऐकायला मिळतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुख्यमंत्र्यांकडून दक्षता

पालकमंत्री होण्यासाठी काही मंत्र्यांनी विशिष्ट जिल्ह्यासाठी आग्रह धरला आहे. त्यात पुण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना थेट कोल्हापुरात ध्वजारोहणासाठीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करतील, असे यादीत म्हटले होते. मात्र नाराजीचा सूर दिसू लागल्याने त्यात बदल करून राज्यपाल रमेश बैस पुण्यात येणार आहेत. रायगडमध्ये सेनेचे भरत गोगावले पालकमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. येथे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार होते, तेथेही बदल करून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील हे ध्वजारोहण करणार आहेत. राज्यात शिवसेना-भाजप- राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे कारण अनेक नेत्यांनी पालकमंत्रिपदावर आधीच दावा ठोकला आहे. असा वाद होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही दक्षता घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या