नाशिकमध्ये गच्चीवरची बाग हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. हजारो नागरिक सध्या गच्चीत किंवा गॅलरीत भाजीपाला लावत विषमुक्त भाजीपाल्याचे सेवन करू लागले आहेत. ज्यांना गच्ची किंवा गॅलरीमध्ये गार्डन करून हवे आहे त्यांना नाशिकमधून मोफत सल्लादेखील दिला जात असून, गेल्या दहा वर्षांपूर्वी सुरु झालेली ही मोहीम आता राज्यभरात नावारुपाला आली आहे.
या मोहिमेचे क्लासेस आणि मासेस असे दोन भाग पडतात असे ‘गच्चीवरची बाग’ चे संदीप चव्हाण सांगतात. यातील क्लासेस भागात ज्यांना ही बाग घरी जाऊन तयार करून हवी आहे त्यांना थेट गच्चीवर जाऊन मार्गदर्शन केले जाते. यात ज्यांच्याकडे खर्च करण्याची तयारी असते ते सर्वजण आपली बाग तयार करून घेतात. यातून रोजगार तर उपलब्ध झालाच शिवाय अनेक माळी किंवा या बागेची निगा राखणारे सर्वजण स्वयंपूर्ण झालेले दिसून येत आहेत.
मासेस या भागात सामान्य माणसे आणि पर्यावरणप्रेमी खास करून सहभागी होतात. यामध्ये त्यांना मार्गदर्शन मोफत दिले जात आहे. दुसरीकडे गारबेज ते गार्डन ही संकल्पना समजावून सांगितली जाते. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये हजारो नागरिकांनी या संकल्पनांना पसंती दिली असून आज हजारो घरांमध्ये घरचा भाजीपाला तसेच विषमुक्त भाजीपाला खाल्ला जात आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रे वाढलेली असतांना नागरिकांच्या सार्वजनिक वर्तनावर अनेक निर्बंध घालण्यात आली होती. यावेळी ऑनलाइन क्लासेस, लेखमालेच्या माध्यमातून नागरिकांना गच्चीवरची बाग संकल्पना समजावली. याचे अनुकरण करत अनेकांनी गच्चीवर बागा साकारल्या असे संदीप चव्हाण यांनी सांगितले.
आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ असल्याचे ओळखत अनेकांनी या बागा फुलवल्या असून आजही या बागा टिकवून ठेवल्या आहेत. घराच्या बाल्कनी, खिडकी, गॅलरी, उपलब्ध वस्तू उदाहरणार्थ प्लास्टिक कापड, बादल्या, टब, गोणपाट, तेलाचे डबे, शीतपेयाच्या किंवा पाण्याच्या बाटल्या असल्या तरी त्यात भाज्या पिकवू शकता. तुमच्याकडे जर 4 इंच खोली असलेल्या सव्वा लिटर पाण्याच्या बाटल्या असली तरी त्यात सुद्धा अंबाडी, पालक, आंबटचुका अशा पालेभाज्या लावू शकता. चार बाटल्यांमध्ये पालेभाज्यांची रोपे लावली तर दोन जणांपुरती पालेभाजी सहज मिळते. 1 फूट लांबीरुंदीच्या आणि 4 इंच खोल असलेल्या कुंडीत देखील दोन माणसांची पालेभाजी सहज उगवते.
कुंडी कशी भराल?
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाच्या तळाशी नारळाच्या शेंड्या, त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा. थोडी माती टाका. झाली कुंडी तयार. एखाद्या कुंडीत झाड नसेल तर त्यातील माती वापरा. बियाणे पेरा आणि साधारणतः महिनाभरात आपण उगवलेल्या भाज्या खायचा आनंद घ्या.
भाज्या कधी येतात?
गच्चीतल्या बागेत सर्वच भाज्या पिकवू शकतो. पालेभाज्या साधारणतः सव्वा महिन्यात तर कांदापात महिनाभरात येते. या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे ऊन मिळाले तरी पुरते. खूप जास्त पाणी घातलेले चालत नाही. कीड दिसते आहे का याचे वारंवार निरीक्षण करावे लागते. तिचे नियंत्रण घरच्या घरी करता येते.
देशी गायीचे गोमूत्र थोडेसे सौम्य करून, ते नसेल तर आंबट किंवा खराब ताक, हिंगाचे पाणी यांची पंधरा दिवसातून एकदा फवारणी केली तरी किडीचे नियंत्रण होते.
बियाणे किंवा रोपे विकत मिळतात. पण तेवढ्यासाठीही बाहेर जायचे नसेल तर महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करता येतो.
अशी साकारता येईल गच्चीवरची बाग
पालक : पालक ही पालेभाजी आहे. पालेभाजींना चार इंच खोलीची जागा पुरेशी असते. पालक एका चौरस फूटांत पाच ठिकाणी लावावी. एका ठिकाणी दोन बिया चिमटीत घेवून पेरभर मातीत पेराव्यात.
आंबट चुका : ही पालकासारखीच दिसणारी भाजी आहे. याची चव मात्र आंबट असते. शिवाय ही जमिनीलगत पसरट वाढते.
धने व शेपू : धने व शेपू ही पालेभाजी आहे. यासही चार इंच खोलीची जागा पुरेशी आहे. एका चौरस फूटाला चार चार बोटांच्या अंतरांवर लागवड करावी. एका चिमटीत पाच पाच बिया घेवून त्यांची पेरभर मातीत बिया रूजवाव्यात.
लाल माठ व हिरवा माठ : लाल माठ व हिरवा माठाचे बियाणे हे आकाराने बारीक असते. यांची उंचीही 2-3 फूट एवढी वाढत असते. पालेभाजी हवी असल्यास एका चौरस फूटांला चिमूटभर बियाणे घेवून ते मातीवर जेवणावर मीठ टाकल्यासारखे चौफेर विखरून द्यावे. मातीखाली दाबायची गरज नाही.
धान्य वर्गीय बियाणे : ज्वारी, बाजरी, मका : मका हे धान्य वर्गीय असते. योग्य पोषण मिळाल्यास त्यास पेरा पेरावर कणीस धरले जातात. मक्यास चार इंच खोलीची जागाही पुरेशी असते. किंवा गच्चीवरची बाग संशोधीत एरो ब्रिक्स बेडमधेही लागवड करता येते. मक्याचे बी हे एका चौरस फूटाला दोन दोन लागवड कराव्यात. बागेत ज्वारी, बाजरी लागवड करतांना एका चौरस फूटाला चार चार बियाणे पेरावेत.
वेलवर्गीय बियाणे : डांगर, वाल, दोडके, गिलके, दुधी भोपळा, कारले, चवळी, काकडी या प्रकारच्या वेलवर्गीय बियाणे हे चार इंच मातीच्या खोलीत अथवा एरोब्रिक्स बेडमध्ये उत्तम प्रकारे येतात. वेलाची वाढ छान होते. कारण त्यास पसरट जागा लागते. एका जागेवर शक्यतो 2-2 बिया पेराव्यात. यांची रोपे तयार करण्याची गरज नसते. तसेच यास नर्सरी बॅग्जमधे बियाणे लागवड करून रोपे वाढवावीत. अशी रोपे वाढलेली बॅग बेड अथवा जमिनीवर ठेवून द्याव्यात म्हणजे मूळं ही तळापासून बाहेर येवून खालील मातीत वाढतात. डांगर ही जमिनीवर पसरणारी वेल आहे. फळ जड असल्यामुळे त्यास मांडावर पसरवणे जरा आव्हानात्मक असते. पण मांडवावर चढवल्यास फळास हवेशीर टोपली बांधावी म्हणजे फळाला आधार मिळून ते चांगले वाढते.
कंदमुळे : मूळा, बिट यासारखी कंदवर्गीय बियाणे ही चार ते सहा इंचाच्या अंतरावर लागवड करावीत. एका चौरस फूटाला चार बियाणांची लागवड करावी. यात शक्यतो एक- एक बियाणे टाकावे. म्हणजे कंदमुळांना वाढीस वाव मिळतो. गाजर हे जमिनीवर विखरून टाकावे. त्यास मातीमधे मिक्स करावे. काही रोपे दाटीवाटीने आल्यास त्यांना विरळ करून घ्यावे. जमल्यास दुसरीकडेही त्यांची लागवड करता येते.
बटाटे : छोटे आकारातील बटाट्यांची निवड करावी. शक्यतो ज्यास डोळे आले आहेत असे निवडावेत. अखंड लावावेत. किंवा मोठ्या आकारातील असल्यास त्याचे चार भाग काप करावेत. कापलेला भाग जमिनीत एक इंच खोल गाडावा.
कांदापात : कांद्याची पात मिळवण्यासाठी पात आलेले जुनाट कांदे लागवड करू शकता. मध्यम आकाराचे किंवा मूठीत बसेल एवढ्या आकाराचे कांदेही लागवड करता येतात. शक्यतो छोटे कांदे लावणे टाळावे. कांद्याचे मूळ हे जमिनीकडे असावे. कांद्यावर एक- दोन इंच माती येईल या स्वरूपात तो मातीत लागवड करावा.
लसूणपात : लसणाची पात घरच्या घरी पिकवता येते. अखंड लसणाच्या एक-एक पाकळी मोकळी करावी. त्याचे मूळ हे जमिनीकडे ठेवूनच त्यास मातीत एक इंच टोकावे. शेंडा वरील बाजूस राहील याची काळजी घ्यावी.
झुडूप वर्गीय पालेभाज्या : करडई, आंबाडी ही 2-3 फूटांपर्यंत वाढणारी भाजी आहे. याची लागवडही एका चौरस फुटाला चार बियाणेच लावावेत. शक्य झाल्यास एक-एक बियाणे लावल्यास झाडांची योग्य वाढ होवून त्यातून भरपूर पालेभाजी मिळते.
मोहरी : मोहरी ही पालेभाजी आहे. एका चौरस फूटाला चार ठिकाणी एक एक बियाणे मातीवर टाकावे.. अथवा त्यास परसरून द्यावे.
फळ व फूल भाज्या : मिरची, वांगे, टोमॅटो, फ्लावर, कॅबेजः यांची बियाणे मातीत पेरावीत, रोपे साधारण एक बोटाएवढे उंच झाल्यावर त्यांची दुसर्या जागेवर पुर्नलागवड करावी. यांची लागवड ही एका चौरस फूटाला एक एक रोप मध्यभागी लागवड करावी. त्याच्या आजूबाजूला पालेभाजींच्या बियाणांची लागवड करता येते.
भेंडी व गवार : हे फळवर्गीय भाज्या आहेत. यांच्या एक एक बियाणे हे एका चोरसफूटाला चार बाजूला चार व मध्यभागी एक अशा पाच बियाणांची लागवड करावी.
दिनेश सोनवणे