Friday, November 22, 2024
Homeनगरचारा टंचाई भेडसावणार नाही, दोन महिन्यांचे नियोजन तयार - ना.विखे

चारा टंचाई भेडसावणार नाही, दोन महिन्यांचे नियोजन तयार – ना.विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

येणारी परीस्थीती लक्षात घेवूनच पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध करण्याचे नियोजन केले असून, दोन ते अडीच महिने चारा पुरेल अशी कार्यवाही केली असल्याने टंचाई भासणार नसल्याची ग्वाही महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

एका वृतवाहीनीला दिलेल्या मुलाखती प्रसंगी ना. विखे पाटील म्हणाले, टंचाई परीस्थीती निर्माण होणार ही शक्यता लक्षात घेऊनच विभागातील अधिकार्‍यांना चारा नियोजनाच्या सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा चारा उत्पादन करण्यासाठी शासनाच्या वतीने शेतकर्‍यांना बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरदूत केली असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या चार्‍याचा दरही शासनाने निश्चित केला आहे. त्यामुळे संपूर्ण उत्पादीत झालेला चारा खरेदी करण्याची हमी शासनाने घेतली असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. चारा छावण्या सुरू करण्याबाबत मतमतांतरे आहेत. कारण यापुर्वी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करून, आज त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण पुढचे दोन ते अडीच महिने चारा पुरेल असे नियोजन विभागाने केले असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर भाष्य करताना ना. विखे पाटील म्हणाले, मुळातच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे सिंचनाचे प्रश्न निर्माण होतात. गोदावरी प्रवरा कुकडी धरण समूहात पाण्याचे प्रश्न नेहमीच निर्माण होतात. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडीला पाणी द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठीच आता पश्चिम वाहीनी नद्याचे पाणी तुटीच्या खोर्‍यात वळविण्याच्या धोरणाला गती द्यावी लागेल. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा आश्वासित केले असल्याने शासन स्तरावर याची कार्यवाही सुरू झाली असून कुकडीच्या पाण्याबाबतही आता पुणे जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून कायमस्वरुपी मार्ग काढावाच लागेल, असे मत व्यक्त करतानाच कुकडीच्या आवर्तनाबाबत लवकरच अधिकार्‍यांची बैठक घेवून निर्णय करण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या