करंजी |वार्ताहर| Karanji
पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील जवखेडे याठिकाणी वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणार्या संस्थेमधील 18 मुलांनी बुधवारी रात्रीचे जेवण केल्यानंतर मध्यरात्री जुलाब, उलट्या, पोटदुखीचा त्रास (Poisoning) होवू लागला. त्यानंतर संबंधित शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी तात्काळ या मुलांना तिसगाव (Tisgav) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या सर्वाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.
त्रास होणार्या 18 मुलांना डॉ. महेश बारगजे यांनी वेळेत उपचार केल्याने यातील 14 मुलांना गुरूवारी सकाळी बरे वाटू लागल्याने पुन्हा संस्थेत पाठवण्यात आले आहे. तर चार मुलांवर सायंकाळपर्यंत उपचार सुरू होते. जवखेडे (Javkhede) या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्याचे काम एका संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. या संस्थेने अनेक मुलांना घडवण्याचे काम देखील केलेले आहे. परंतु बुधवारी या संस्थेतील काही मुलांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचे समजल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
रात्रीचे जेवण केल्यानंतर जुलाब, उलट्या, पोटदुखी होऊ लागल्याने जवखेडे येथील दहा ते पंधरा वयोगटातील 18 मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये बुधवारी मध्यरात्री दाखल करण्यात आले. या सर्व मुलांवर उपचार केल्यानंतर त्यापैकी 14 मुलांना गुरूवारी सकाळी डीचार्ज दिला आहे तर चार मुलं हॉस्पिटलमध्ये अजूनही उपचार घेत असल्याची माहिती डॉ. बारगजे यांनी दिली. हा त्रास कशामुळे झाला हे त्यांना सांगता आले नाही.