नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कर्नाटकमध्ये देशाची मान शरमेने खाली जाईल अशी घटना घडली आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये देश-विदेशी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आहे. पर्यटकांना मारहाण करत त्यातील इस्रायली महिलेसह दोन महिलांवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. बेंगळुरूपासून जवळपास ३५० किमी दूर असलेल्या कोप्पलमध्ये ही घटना घडली आहे. हम्पी येथे इस्रायलच्या २७ वर्षीय आणि भारतातील होम स्टे मालक असलेल्या २९ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री हा गुन्हा घडला. यावेळी या महिलांसह तीन पुरूष पर्यटकही उपस्थित होते. यापैकी एका पुरूष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलांवर अत्याचार करण्याआधी अन्य तीन पर्यटकांना कालव्यात ढकलून दिले. आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे अश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पर्यटक थांबलेल्या ठिकाणी रात्री दुचाकीवर बसलेले तीन आरोपी तिथे आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर जाण्याचा रस्ता विचारला. होम स्टे मालक स्थानिक असल्यामुळे तिने जवळपास पेट्रोल पंप नसल्याचे म्हटले. त्यानंतर दुचाकी चालकांनी त्यांच्याकडे पेट्रोलची मागणी केली, थोड्या वेळाने ते पर्यटकांकडे पैसे मागू लागले. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा दुचाकीस्वार आक्रमक झाले आणि त्यांनी पर्यटकांशी गैरवर्तन केले. महिला पर्यटकांना त्रास देत असताना इतर तीन पुरूष पर्यटक आरोपींना रोखण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी पाचही जणांना धमकवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून पैसे मागितले. आरोपी कन्नड आणि तेलगू भाषेत बोलत होते. त्यानंतर आरोपींनी तिन्ही पुरुषांना मारहाण आणि शिवीगाळ करत जबरदस्ती कालव्यात फेकले. तर दोन महिलांवर अत्याचार करण्यात आला.
डॅनियल आणि पंकजला पोहता येत असल्यामुळे ते पोहत बाहेर पडले. पण ओडिशाचा पर्यटक बिबास आढळून आला नाही, असे पोलिसांनी सांगितले. इतर दोघांना दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळपासून पोलीस नदीमध्ये बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत होते, त्याचा शनिवारी सकाळी मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा