नवापूर | श. प्र. –
तालुक्यातील वाघदा गावात अवैध लाकूड कारखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर लाकूड तस्कराने कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. वन विभागाच्या पथकाला या कारवाईत ५० लाखांचा अवैध लाकडाचा मोठा मुद्देमाल व २० लाखांचे वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
मिळालेला गुप्त बातमीवरून विभागीय वनाधिकारी दक्षता तसेच नंदुरबार वन विभाग व नंदुरबार पोलीस यांनी संयुक्तपणे नंदुरबार रोहयो वनक्षेत्र मधील वागदी (ता. नवापूर) येथे राजेंद्र प्रभाकर वसावे उर्फ राजू बांड यांच्याकडे धाड टाकण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर त्याने कुऱ्हाडीने वार करून वनरक्षक दीपक पाटील यांना गंभीर जखमी केले व मोठा धुडगूस घातला. त्यानंतर उपस्थित वन कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमास व त्याचे इतर तीन साथीदार यांना अटक केली.
सदर इसम यांच्याकडे साग, खैर, सिसम, तयार फर्निचर, मोठ्या प्रमाणात फर्निचर तयार करण्यासाठी लागणारे यंत्रसामग्री, मोठे अवैध सुरू केलेले आरा मशीन आदी आढळून आले. सदर मुद्देमाल सुमारे सात आठ वाहनात जमा करण्यात आला. जप्त मुद्देमालाची अंदाजीत किंमत 50 लाख व वाहनांची 20 लाख अशी एकूण अंदाजीत 70 लाख रुपयाचा मुद्देमाल जमा केला आहे.
सदर कारवाई हे भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे करण्यात आली. सदर कारवाई ही वनसंरक्षक धुळे प्रादेशिक, पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपवनसंरक्षक नंदुरबार प्रादेशिक, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे,
सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर, शहादा, धडगाव, गस्तीपथक शहादा, रोहयो, सर्व वनक्षेत्र, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी नंदुरबार उपनगर व विसरवाडी पोलीस स्टेशन, इको बटालियनचे अधिकारी व जवान यांच्या उपस्थितीत यशस्वी कार्यवाही करण्यात आली.