घारी |वार्ताहर| Ghari
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिराजवळ बाजारचे दिवशी शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास वनविभागाच्या वाहनाने एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. वनविभागाचे वाहन (क्र. एमएच 17 एएन 0079) कोपरगावच्या दिशेने जात असताना मंदिराकडून चांदेकसारे गावात वळणार्या एका शेतकर्याच्या ट्रॅक्टरला समोरुन धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. वनविभागाच्या वाहनाचे समोरील बाजूस काहीसे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. चांदेकसारे गावचा बाजार भैरवनाथ मंदिराच्या पटांगणात भरत असतो.
या बाजारात चांदेकसारे, घारी, डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, हिंगणी आदींसह परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक बाजारसाठी आलेले असतात. गेल्याच आठवड्यात बाजारच्या दिवशी रस्ता ओलांडताना एका महिलेला दुचाकी स्वाराने जोराची धडक दिल्यामुळे महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा आठवडे बाजारच्याच दिवशी हा अपघात झाला. त्यामुळे या भागात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. झगडे फाटा ते पुणतांबा फाटा हा रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीचा असल्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते. तसेच हा रस्ता आता सुस्थितीत असल्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहने भरधाव वेगाने धावतात.
भैरवनाथ मंदिर पटांगणात शनिवारी आठवडे बाजारात बाजारकरूंची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच माध्यमिक शाळा देखील याच परिसरात असल्यामुळे विद्यार्थ्यांची देखील दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. भैरवनाथ मंदिर रस्त्याच्या दक्षिण बाजूला व रस्त्याच्या उत्तर बाजूला नव्यानेच बांधण्यात आलेली शनी मंदिर, खंडोबा मंदिर व महादेव मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. तसेच एसटीचा थांबा देखील येथेच आहे त्यामुळे एकूणच या परिसरात नेहमीच माणसांची वर्दळ असते. त्यामुळे भैरवनाथ मंदिर परिसराच्या शंभर मीटरच्या अंतरामध्ये गतीरोधक तातडीने बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.