Friday, May 3, 2024
Homeनाशिकहरसूल वाघेरा घाटात वनसंपदेला आग

हरसूल वाघेरा घाटात वनसंपदेला आग

नाशिक । Nashik

त्र्यंबक तालुक्यातील वनसंपदेला वारंवार वणवा लागत आहे. आज दुपारच्या सुमारास हरसूल वाघेरा घाटात वणवा लागल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील डोंगरांना सातत्याने वणव्याची झळ बसत आहे.

- Advertisement -

कालच्या रात्री माळेगाव परिसरात पुन्हा वणवा हजारो हेक्टर वरील वनसंपत्ती जाळून खाक झाली. दरम्यान वनविभागाचे दुर्लक्ष आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने मागील काही दिवसापासून या भागातील डोंगराला अनेकवेळा वणवा लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. वारंवार डोंगराला आग लागण्याच्या घटनांमुळे त्र्यंबक भागातील वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्र्यंबक तालुक्यात मोडणारा हरसूल, माळेगाव, गणेशगाव तसेच रोहिला डोंगरासह आजूबाजूचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या भागातील वनसंपदा बहरलेली आहे. त्यात गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींकडून मोठा गाजावाजा करत या भागांत वृक्षलागवड केली जात आहे. त्यामुळे डोंगरावर हजारो, लाखो वृक्ष लावल्याची माहिती देणे आणि सेल्फी काढण्यात लोकप्रतिनिधींचा पुढाकार असतो.

मात्र, या वनसंपदेचे वन विभागाकडून जतन आणि संरक्षण होताना दिसत नाही. या टेकड्यांवर वृक्षलागवडीनंतर अनेक रोपटी मोठी होत आहेत. त्यामुळे डोंगरांचा हा भाग हिरवागार झाला आहे. परंतु वृक्षारोपण केलेली झाडे पूर्णपणे वाढण्या अगोदरच दरवर्षी वणव्याच्या घटनांमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून वनसंपदेचे अस्तित्व संपुष्टात येत आहे.

विशेष म्हणजे हे वणवे रात्रीच्या सुमारास लागत असून अशावेळी अंधारात स्थानिकांना वणवे विझवण्यात दमझाक होते. तरीही अनेकदा वन विभागाला या आगीची माहिती मिळत नाही. अनेकवेळा नागरिकांनी कळवल्यांतर वन विभागाचे कर्मचारी डोंगरावरील आग विझवण्यासाठी धावपळ करतात.

मात्र, तोपर्यंत अनेक लहानमोठी झाडे आगीत जळून खाक झालेली असतात. रोहिला, माळेगावच्या डोंगरांना सातत्याने लागणारे वणवे हे मद्यपी आणि गर्दुल्ल्यांकडून सिगारेट आणि तत्सम पदार्थांसाठी पेटवलेल्या आगीतून लागत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ही लोक अपवाद सोडले तर स्थानिक नागरिकांची गुरे ढोरे चरत असतात.

मग ही लोक कशी आग लावतील हा ही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे वन विभागाने हे लक्षात घेऊन ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. तसेच वनविभागासह पर्यावरण प्रेमींनीही वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी डोंगरावर पार्ट्या करणाऱ्यांबाबत तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या