Saturday, September 21, 2024
Homeनगर'त्या' बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे वन विभागाला आदेश

‘त्या’ बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे वन विभागाला आदेश

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यात बिबट्याने नागरी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या घटनेची राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ दखल घेतली असून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास तात्काळ १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच बिबट्याला पकडण्याचे आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी यावल येथील पथक, जळगाव येथील पथक, नाशिक येथील पथक, नगर येथील पथक, ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्याचे जाहीर केले आहे.

पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याने मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या तीन घटना घडल्या. काल पाथर्डी तालुक्यातील शिरपूरगाव अंतर्गत पानतासवाडी शिवारात तारकनाथ वस्ती वरील सार्थक बुधवंत या तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेल्याची घटना घडली त्यानंतर वण विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सर्थकचा शोध घेतला. पण नंतर त्याचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे नागरिकांकडून बिबट्याला पकडण्याची मागणी होत होती.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने या परिसरात शोध मोहीम राबवली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांनीही वनमंत्री श्री. राठोड यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. त्यावर तात्काळ वनमंत्री राठोड यांनी दखल घेत बिबट्याला पकडण्याचे आदेश दिले.

श्री. राठोड यांनी, स्थानिक नागरिकांनीही याकामी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. बिबट्याच्या या परिसरातील वावर आणि परिसरातील नागरिक यांच्यामध्ये असणारी भीती याबाबत परिस्थिती हाताळण्यासाठी तात्काळ वन्यजीव पश्चिम विभाग, मुंबई येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि मुख्य वनसंरक्षक (नाशिक) श्री गुदगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सूचना दिल्या. अहमदनगर येथील उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनीही घटनास्थळी जात नागरिकांशी संवाद साधला.

यापूर्वी या परिसरात बिबट्याने दोन हल्ले केले आहे. तिसगांव वनपरिक्षेत्रातील मौजे मढी येथे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी कु.श्रेया सुरज साळवे ( वय वर्षे ०३ वर्षे ६ महिने) आणि केळवंडी येथील चि. सक्षम गणेश आठरे ( वय वर्षे ०८) याच्यावर २५ ऑक्टोबर रोजी बिबट्याने हल्ला केला होता. दुर्दैवाने हे दोघे जण या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. वन विभागाने त्यांच्या कुटुंबियांना यापूर्वीच मदत सुपूर्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या