Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधबलवान ग्रहांची राणेंना साथ!

बलवान ग्रहांची राणेंना साथ!

नारायण तातू राणे यांचा जन्म 10 एप्रिल 1952 रोजी झाला. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या ते केंद्रीय मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा जन्म चेंबूर (मुंबई) येथे तातू सिताराम राणे आणि लक्ष्मीबाई राणे यांच्या पोटी झाला. त्यांचे शिक्षण 11 वी पर्यंत झाले आहे. त्यांना निलेश आणि नितेश राणे अशी दोन मुले आहेत.

राणे यांनी विसाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला. चेंबूर येथे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते कोपरगावचे नगरसेवक झाले. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात राणेंना प्रथम महसूल मंत्रालय मिळाले. 1999 मध्ये फेब्रुवारी ते ऑक्टोबर असे 9 महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते. राणे यांच्या नेतृत्वात भाजप-सेना युतीचा ऑक्टोबर 1999 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला. ठाकरे आणि राणे यांच्यातील संबंध अखेर 2005 मध्ये पूर्णपणे बिघडले. राणे अखेर पक्षाबाहेर पडले.

- Advertisement -

राणे 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांचा आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून समावेश झाला. 2005 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी कोकण विभागातील त्यांच्या जुन्या मालवण जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक जिंकली. 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. काँग्रेस नेतृत्वाने आपल्याला मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन भंग केल्याचा आरोप राणे यांनी केला. काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले. राणेंनी माफी मागितल्यानंतर काँग्रेसने हे निलंबन मागे घेतले. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मंत्रिमंळात राणे यांना उद्योगमंत्री म्हणून संधी दिली. पुढे काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याने राणे यांनी जुलै 2014 मध्ये राजीनामा दिला. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2017 मध्ये राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. हा पक्ष त्यांनी 15 ऑक्टोबर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला. पुढे भाजपने त्यांना केंद्रात संधी दिली. जुलै 2021 च्या केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री करण्यात आले.

मूर्ती लहान पण कीर्ती मोठी असे वर्णन नारायण राणे यांचे करता येईल. राजकारणात त्यांनी सक्षम नेतृत्व केले. ते माध्यमात कायम चर्चेत असतात. त्यांची कारकीर्द एक शिवसैनिक म्हणून सुरू झाली. नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. या काळात त्यांनी शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, भाजप असा पक्षबदलही केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. 71 वर्षात प्रवेश केला असला तरी त्यांचा उत्साह दांडगा आहे.

हस्तसामुद्रिकदृष्ट्या राणे यांच्या दोनही हातावरील त्यांचे भाग्य व व्यक्तिमत्व यांची झलक पाहणार आहोत. नेतृत्व क्षमता उपजत असावी लागते. त्यासाठी अंगी धाडस असावे लागते. त्यांच्या अंगात उपजत नेतृत्वपुण आहेत. राणे यांचे लाखो समर्थक आहेत. कोकण पट्यात दबदबा आहे. स्पष्टवक्ते राणे बोलतानाही भिडस्त आहेत. शिवसेनेत काम करताना त्यांनी मंत्रिपद भूषविले. शिवसेना सोडल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यावर ते जाहीररित्या मुखमंत्री पदावर दावा ठोकत असत. जनाधार असल्याने राजकीय पक्षांना त्यांना नाराज करणे जड जाते. जनतेचा विश्वास मिळविण्यासाठी राणे यांचे गुरु बळ मोठे आहे. राजकारण करताना नुसतेच गुरुबळ मोठे असून चालत नाही तर मंगळ ग्रहाची साथ मोठी लागते.

राणे यांचा डावा हात

राणे यांच्या संचित घेऊन आलेल्या डाव्या हातावरील ग्रह शुभ आहेत. हातावरील मुख्य रेषा व त्यांचा पोत हा भाग्यकारक असून, त्यांचा उगम व शेवट शास्त्राच्या नियमाप्रमाणे आहे. हातावरील रेषा त्यांच्या असलेल्या अढळ स्थानावरून ढळल्या किंवा त्यांच्या बदल दिसून येत असेल तर भाग्य साथ देत नाही. तळहातावरील रेषांचे स्थान, त्यामध्ये मुख्यतः आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तक रेषा, भाग्य रेषा व रवी रेषा यांचे स्थान नियमाप्रमाणे असेल तर या रेषांच्या आतील ग्रह बलवान होतात. हातावरील ग्रहांचे बलाबल त्यांच्या आकारावरून व एकंदरित असलेल्या त्यांच्या उभारपणामुळे मोजला जातो. तळहाताकडून बोटाकडे जाणार्‍या भाग्य रेषा व रवी रेषा ह्या जर निर्दोषपणे सरळ रेषेत, शनी ग्रहावर म्हणजे मधल्या बोटाच्या खाली मध्यभागी एकच रेषा जाऊन थांबत असेल तर व्यक्ती भाग्यवान असतात. यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक टंचाई नसते व अशी भाग्यरेषा राणे यांच्या डाव्या हातावर आहे. तसेच त्यांच्या हातावरील रवी रेषा तिसर्‍या बोटाखाली सरळ जाऊन थांबल्याने रवी ग्रह शुभ झाला आहे. डाव्या हातावरच्या ग्रह रेषा ह्या संचिताच्या असतात. म्हणजे तुमच्या मूळ भाग्यात असतात. उजव्या हातावरील रेषा या कर्माच्या असतात. डाव्या हातावरील भाग्याची साथ राणे यांना पूर्णपणे लाभली आहे.

डाव्या हातावर संचित असते. यात भाग्योदय, वैवाहिक सौख्य, आर्थिक परिस्थिती, विद्वत्ता,व्यक्तिमत्व, तुरुंगवास, गंडांतर योग हे प्रामुख्याने असतात, या बाबी भाग्यावर परिणाम करीत असतात. कर्माच्या म्हणजे उजव्या हातावरील भाग्यावर परिणाम करतात. राणे यांच्या डाव्या हातावरील ग्रह, रेषा अति भाग्यकारक असल्याने परमेश्वरने त्यांच्या संचितात सौभाग्य दिले आहे. डाव्या हातावरील खालचा मंगळ हा उभार घेतला असल्याने त्यांच्या अंगी धाडस आहे. मंगळ ग्रहावर आयुष्य रेषेतून अंगठ्याकडे जणारी वक्र रेषा क्रोधाच्या भावनेची आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरली असून त्यांची कल्पनाशक्ती मोठी व अफाट आहे. चंद्र ग्रहावर मस्तक रेषा उतरल्याने ते भावनिक आहेत. डाव्या हातावरचा अंगठा मजबूत व त्यावरची पेरे प्रमाणात आहेत. तळहात व हाताचा पंजा छोटा असला तरी त्यावरील शुक्र, चंद्र व बोटा खालील गुरू, शनी, रवी व बुध ग्रह बलवान आहेत. हाताच्या पंजापेक्षा बोटे आखूड असल्याने त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची मानसिकता त्यांच्यात आहे.

उजवा हात

राणे यांच्या उजव्या हाताकडे नुसते बघितले तरी त्यांच्या हातावरची निरोगी, निर्दोष व काटक आयुष्य रेषा व आयुष्य रेषेसोबत असलेली अखंड मंगळ रेषा लक्ष वेधून घेते. या रेषा त्यांना अधिकची ऊर्जा प्रदान करीत आहेत. आयुष्य रेषा निर्दोष असल्याने शारिरिक आरोग्याच्या तक्रारी नाहीत. मंगळ रेषेमुळे अधिकचा उत्साह व ऊर्जा मिळते. त्यामुळे कामात व्यस्त असतात, त्यांना थकवा जाणवत नाही. आयुष्य रेषेच्या आत खालचा मंगळ ग्रह व शुक्र ग्रह यांचे एका आडव्या रेषेने विभाजन झाले आहे. हे विभाजन, राणे यांची दोन मने किंवा विचार एका वेळी कार्यरत असतात. राणे यांची दोन मने कार्यरत असताना त्याचा मूड ट्विस्ट होतो. म्हणजे आयुष्य रेषेच्या आत असलेल्या या आडव्या रेषेने खालच्या मंगळ प्रभावात, बेचैनी, अस्वस्था, मनस्वी राग व चिंता असते. आडव्या रेषेच्या खाली शुक्र ग्रह आहे, तो त्यांना आनंदित, उत्साहित व हलक्या फुलक्या मूडमधे ठेवतो. आनंदी असताना त्यांचेकडून कुठलेही काम करून घ्यायचे असेल तर ते सहज होणार आहे. मूड खराब असता काम होणे संभव नाही. विशेषतः त्यांचे कार्यकर्ते वा कुटुंबियांनी त्यांचा मूड केव्हा कसा असतो हे ओळखत असणार. त्यांच्या उजव्या हातावरील भाग्य रेषा मनगटापासून उगम पावत आहे व ती थेट सरळ शनी ग्रहावर जाऊन थांबल्याने ते भाग्यवान आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांना आर्थिक चिंता असणारा नाही. या भाग्य रेषेने ऐश्वर्य प्रदान केले आहे. राणे यांच्या उजव्या हातावरील रवी रेषा आयुष्य रेषेतूनच उगम पावत असल्याने त्यांना मान, सन्मान, प्रसिद्धी मिळाली आहे. रवी रेषा आयुष्य रेषेतून उगम पाऊन रवी ग्रहावर जाणार्‍या या रेषेनेच वयाच्या 20 व्या वर्षापासूनच त्यांना प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली. राणे यांच्या उजव्या हातावरची मस्तक रेषा चंद्र ग्रहावर थोडी खाली उतरली आहे, ती तळहाताच्या बाहेर जाऊन थांबली आहे. ही मस्तक रेषा राणे यांना हुशारी प्रदान करीत आहे. राजकारणातील चाली, कुरघोडी व स्वतःचे महत्त्व पटवून देण्यात या मस्तक रेषेचे योगदान मोठे आहे. मस्तक रेषा व हृदय रेषेच्या मधला वरचा मंगळ ग्रह, उभार घेतलेला व शुभ फळ देणारा आहे.

वरच्या मंगळ ग्रहाच्या कारकत्वात शांतपणे विचार मंथन, विचारपूर्वक राजकारणातील चाली, शत्रूला किंवा विरोधकाला शांत डोक्याने नामोहरम करण्याचे नियोजन या वरच्या मंगळ ग्रहाने बहाल केले आहे. चंद्र ग्रह स्वच्छ आहे. त्यावर आडव्या रेषा नाहीत. चंद्राचा उभार स्वतंत्र आहे व त्यांच्या तळहातावर चंद्र ग्रह मनगटाकडे शुक्र ग्रहांपेक्षा अधिक विस्तारित झाल्याने, अधिकची हुशारी व मनातील कल्पना साकार करण्याची प्रतिभा लाभली आहे. नेतृत्व करण्याची क्षमता मजबूत अंगठा व गुरु व मंगळ ग्रहाने प्रदान केली आहे. आपले म्हणणे किंवा मुद्दा स्पष्टपणे मांडण्याची त्यांची ताकद आहे. त्यांची नेतृत्व क्षमता बाळासाहेब ठाकरेंनी ओळखली होती. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. हातावरील आयुष्य रेषा आयुष्मान योग्य दाखवीत आहे व त्याला जोड मंगळ रेषेची असल्याने अजून किमान पंधरा वर्षे ते सक्रिय राजकारणात राहतील इतकी क्षमता त्यांना परमेश्वराने बहाल केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या