कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या रेणुकानगर येथील रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना रस्त्यावर रिक्षा घालू नये याचा राग आल्याने रिक्षा चालक व त्याच्या समर्थकांनी एका माजी नगरसेवकासह कॉन्ट्रॅक्टर व त्याच्या भावांना गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे. शासकीय आयटीआय कॉलेज रेणुकानगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू होते. या रस्त्यावर भंगार भरून निघालेल्या रिक्षा चालकाला कॉन्ट्रॅक्टर गणेश मोरे, योगेश मोरे, पवन मोरे यांनी विनवणी केली की रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावर अंतिम डांबर टाकलेल्या असून आपण या ठिकाणाहून रिक्षाने येऊ नये. याचा रिक्षा चालकाला राग आल्याने त्याने कॉन्ट्रॅक्टर गणेश मोरे यांना मारहाण केली.
हे भांडण सोडवण्यासाठी त्यांचे बंधू योगेश व पवन मोरे व माजी नगरसेवक कृष्णा आढाव आले असता रिक्षा चालकाच्या समर्थकांनी लाकडी दांडके, रॉड व दगडाच्या साह्याने वरील चौघांवर हल्ला केल्याने यामध्ये गणेश मोरे, योगेश मोरे व पवन मोरे गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ एसजीएस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून माजी नगरसेवक कृष्णा आढाव किरकोळ जखमी आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सुरु होते. या घटनेमुळे सोशल मीडियावर काही युवकांनी गाव बंद करण्याचा इशारा दिला आहे. शहरासह तालुक्यातील नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.