घोटी । वार्ताहर Ghoti
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या निर्मला गावित उद्या (दि.28)दुपारी 12 वाजता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडणार आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात गावित यांच्यासमवेत त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांतील अनेक माजी जनप्रतिनिधी, माजी सभापती, सरपंच, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
निर्मला गावित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. काँग्रेसतर्फे त्यांनी दोन वेळा इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा नव्या राजकीय दिशा स्वीकारत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनतेच्या मागण्या, विकासकामांची अंमलबजावणी आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निर्मला गावित यांनी सांगितले.