Saturday, July 27, 2024
Homeनगरग्रामीण दृष्टी असलेला मातीतला नेता!

ग्रामीण दृष्टी असलेला मातीतला नेता!

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे ग्रामीण माणसांच्या समस्यांसाठी लढणारा मातीतला नेता राज्याने गमावला आहे. संघर्षातून राजकीय यश साधणारे बबनराव ढाकणेंचे व्यक्तीमत्व सातत्याने ग्रामीण माणसांच्या विकासासाठी झटत राहिले. जुलै 1968 रोजी पाथर्डी तालुक्याच्या रस्ते, वीज, जलसींचन प्रश्‍नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावली व सभागृहात उडी घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हा घटनेने त्यांच्यातील धाडसी नेत्याचा परिचय झाला.  
सभागृहात पत्रके भिरकावली प्रकरणी विशेष हक्कभंग समितीने 7 दिवसाच्या कैदेची शिक्षेची शिफारस केली. यावर विधानसभा सभागृहात तब्बल तीन तास वादळी चर्चा झाली. अखेर सात दिवसाच्या कैदेच्या शिक्षेवर विधानसभा सभागृहाचे शिक्कामोर्तब झाले. ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी झाली. 15 जुलै 1968 मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातुन सुटका व 16 जुलै 1968 तालुक्यातील जनतेकडून पाथर्डीत एखाद्या नायकासारखे अभूतपूर्व मिरवणूकीने जंगी स्वागत झाले. राजकारणात एक मोठा पल्ला गाठण्याची ही सुरूवात होती. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा होत्या. त्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.
 

बबनराव ढाकणे यांचे वडिल दादाबा नारायण ढाकणे यांचे कुटुंब पाथर्डी तालुक्यातील चुंभळी या गावचे. त्यांचा जन्म बुधवार 10 नोव्हेंबर 1937 रोजी अकोले गांवी झाला. 1 जानेवारी 1952 देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव निर्‍हाळी यांच्या प्रचारात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. हाच त्यांचा राजकारणाशी पहिला संपर्क. 14 ऑक्टोबर 1955 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी गोवा मुक्ती संग्रामात सहभागी, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली दुसर्‍या तुकडीत सहभाग घेतला. अहमदनगर जिल्हयातील सर्वात कमी वयाचा व पहिला सत्याग्रही होण्याचा त्यांना मान मिळाला. पुढील काळात तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय चळवळीत ते सक्रीय झाले.  1967 मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानुर गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने एकमेव उमेदवार म्हणून विजयी झाले. जानेवारी 1969 मध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी, दडपशाहीस कंटाळून पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग केला. 1972 मध्ये  जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गटातुन स्थानिक जनता आघाडीचे उमेदवार म्हणुन ते विजयी झाले. 1972 मध्ये ते पाथर्डी पंचायत समितीचे सभापती झाले.

विधानसभेच्या 1978च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन 37134 मते घेऊन ते विजयी झाले. तत्कालीन पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणुन त्यांची निवड झाले. एकाच वर्षात डिसेंबर 1979ला पुलोद मंत्रीमंडळात ते ग्रामविकास मंत्री झाले.  मार्च 1979 महाराष्ट्र जनता पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची बहुमताने निवड झाली. 1980 मध्ये विधानसभा निवडणुकीत  पाथर्डी मतदार संघातुन जनता पक्षाचा उमेदवार म्हणुन दुसर्‍यांदा आमदार झाले. 17 डिसेंबर 1981 रोजी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली. डिसेंबर 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. 1985  महाराष्ट्र विधानसभेवर पाथर्डीतून सलग तिसर्‍यांदा विजयी झाले.  
1988मध्ये  महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणुन निवड झाली.
 

1989 या वर्षातील राजकारणाने पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण दिले. यावेर्षी नवव्या सार्वत्रीक निवडणूकीत बीड जिल्हा लोकसभा मतदार संघातुन जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणुन ते विजयी झाले. देशातील पहिले वंजारी समाजाचे खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला. व्हि.पी. सिंग सरकार कोसळल्यानंतर पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय उर्जा राज्यमंत्री त्यांचा समावेश झाला. 12 फेब्रुवारी 1994 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत पाथर्डी येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचवर्षी त्यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली. 1994च्या  शरद पवार मंत्रीमंडळात कॅबीनेटमंत्री म्हणून निवड झाली.

बबनराव ढाकणे यांनी 6 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांचे वडिल कै.दादाबा ढाकणे यांचे 28 ऑगस्ट 2009 रोजी वृदधापकाळाने निधन झाले. त्यांच्या दशक्रियाविधी प्रसंगी मरणोत्तर देहदानाची घोषणा उपस्थित जनसमुदाया समोर करून संकल्प जाहीर केला होता.  

केदारेश्‍वरची उभारणी


1980-90 या दशकात शेवगाव तालुक्याच्या पुर्व भागात बोधेगाव येथे केदारेश्‍वर सह साखर कारखान्याची यशस्वी उभारणी करून सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती तसेच उसतोड कामगार संघटनेचा नेता साखर कारखानदार झाला. 1999 मध्ये ते काँग्रेस पक्षाचा त्याग करून शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. पुढे 2004 पासून पक्षीय राजकारणापासून ते अलिप्त झाले. पुढे शिक्षण आणि सामाजिक कामात ते व्यस्त झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या