Sunday, January 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजऊसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळले

ऊसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळले

शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori


दिंडोरी तालुयातील निळवंडी शिवारात बिबट्याचा नियमित वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी ऊस तोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी व ऊसतोड मजूरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

- Advertisement -


निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या या भागात ऊस तोडणी सुरु असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. काल निळवंडी येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या गट क्रमांक ३४३ मधील एक एकर क्षेत्रात ऊस तोडणीचे काम सुरू होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ऊसतोड मजूर ऊस तोडणी कामात व्यस्त असतांना ऊसाच्या दाट पाचटात बिबट्याचे दोन लहान बछडे दिसून आले. अचानक बछडे समोर आल्याने ऊसतोड मजूरांची मोठी धावपळ उडाली. त्यांनी तातडीने ही माहिती शेतमालक अंबादास पाटील यांना दिली. त्यानंतर शेजारीच असलेले चंदु भास्कर पाटील यांच्या गट क्रमांक ३४२ मधील ऊस तोडणीचे काम सुरू असतांना दुपारी २ वाजेच्या दरम्यान तिथेही दोन बछडे आढळून आले.

YouTube video player

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित शेतकर्‍यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क करून माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल भटू बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोरख गांगोडे, वन मजूर शिरसाठ, गांगोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी ऊस तोडणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे बछडे साधारण पंधरा ते वीस दिवसांचे असल्याचे वनरक्षक गोरख गांगोडे यांनी सांगितले.

सध्या रब्बी हंगामामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हिरवळ असून बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत असल्याने तो कधी आणि कुठून हल्ला करेल याची भीती शेतकर्‍यांना सतावत आहे. बिबट्याच्या भीतीने अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. निंदणी, कोळपणी व ऊस तोडणीची कामे सुरू असतानाच बछडे आढळल्याने मजूर वर्गाने शेतात येण्यास नकार दिला आहे. विशेषतः महिला मजूर वर्ग कामास येण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना स्वत:च शेतीचे कामे करावी लागत आहे. बछडे आढळल्याने मादी बिबट्या परिसरातच असल्याची शयता अधिक बळावली असून नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.

निळवंडी परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मागील काळात निळवंडी येथे बिबट्याने दोन शाळकरी मुलांचा जीव घेतला आहे. आता ऊस तोडणी सुरु असतांना बिबट्याचे चार बछडे सापडले आहे. सध्या सर्वत्र ऊस तोडणी असल्याने शेतकरी व ऊस कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वनविभागाने त्वरीत दखल घेवून या परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात यावा.
अंबादास पाटील, शेतकरी निळवंडी

ऊसाचे क्षेत्र आणि नाल्यांचा परिसर वाढलेले झाडे झुडपे यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा असल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी सावधगिरीने शेतात काम करावे, पशुधन बंदिस्त गोठ्यात बांधावे. शेतकर्‍यांनी आपले जनावरे गोठ्यात बांधावी, तसेच बाहेर लाईट लावावी, लहान बालक व वयोवृध्दांनी एकटे बाहेर पडू देवू नये, रात्रीच्या वेळी बाहेर पडतांना बॅटरीचा वापर करावा. शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी आणि बिबट्याची कोणत्याही प्रकारची हालचाल आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा.
गोरख गांगोडे, वनरक्षक दिंडोरी

ताज्या बातम्या

आता चुकाल तर सर्वच … – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

0
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा आज मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली....