नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विमा पॉलीसीधारक (Insurance Policy Holders) मृत झाल्यावर त्याच्या विम्याचे बनावट कागदपत्र बनवून एका सराईत ठगबाजाने वारसदारासह मुंबईतील (Mumbai) इन्श्युरंस कंपनीची फसवणूक (Fraud) केली आहे. मृताच्या वीमा पॉलीसीचे तब्बल १९ लाख रुपये परस्पर वटवून घेत या अनोळखी ठकबाजाने हा गंडा घातला असून कंपनीने पडताळणी केली असता, गंगापूर रोडवरील कॅनरा बँकेतून ठकबाजाने हे पैसे काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील रिलायन्स निप्पाॅन लाईफ इन्श्युरंस कंपनीमार्फत विक्रम सिंग (रा. राधाराणी सिन्हा रोड, आदमपूर, राज्य बिहार) यांनी काही महिन्यांपूर्वी जीवन वीमा पॉलीसी रजिस्टर्ड केली होती. त्यानंतर त्यांचे आकस्मिक निधन झाले. दरम्यान, विक्रम सिंग यांचा वारसदार म्हणजेच त्यांच्या मुलाने वडिलांच्या या वीमा पॉलीसीचे कागदपत्रे हाती असल्याने १९ लाख ३८ हजार रुपये मिळविण्यासाठी रिलायन्स निप्पाॅन कंपनीकडे ई-मेलद्वारे संपर्क केला. तेव्हा या कंपनीने (Company) विक्रम सिंग यांना मेलद्वारे रिप्लाय करुन सिंग यांच्या विमा पॉलीसीचे पैसे वारसदारांना दिल्याचे सांगून प्रकरण निरस्त केल्याचे सांगितले.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; ‘हे’ उमेदवार रिंगणात
त्यामुळे सिंग यांच्या मुलाला (वारसदार) मोठा धक्का बसला. त्यांनी मुंबईतील कंपनीचे कार्यालय गाठून विम्याचे पैसेच मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कंपनीने पडताळणी केली. तेव्हा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर वासुदेव टिकम (रा. क्रांती सोसा, कन्नमवारनगर, विक्रोळी पूर्व, मुंबई) यांनी संपूर्ण प्रकरणाची फेरतपासणी केली. त्यात मोठा घोळ झाल्याचे दिसून आले. कारण, विक्रम सिंग यांच्या पॉलीसीचे बनावट कागदपत्र बनवून अनोळखी संशयिताने नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील कॅनरा बँकेतून विम्याची रक्कम वटविल्याचे समोर आले.
दरम्यान, त्यानुसार टिकम यांनी नाशिक गाठत गंगापूर पोलीस ठाण्यात अनोळखी ठकबाजाविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक एन. पी. सोळंके यांनी प्रकरणाची माहिती घेत पडताळणी केली. दाखल गुन्ह्यानुसार तांत्रिक विश्लेषण व तारखांच्या सीसीटीव्ही फूटेजनुसार सोळंके तपास करत आहेत. तसेच तपासासाठी पथकही रवाना केले जाणार आहेत.
हे देखील वाचा : मविआचा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला; कॉंग्रेसच्या उमेदवाराची माघार
अशी झाली फसवणूक
संशयिताने ६ जून ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मृत सिंग यांचे बनावट कागदपत्रे बनवून आवश्यक ते बदल करुन प्रकरण गंगापूर रोडवरील कॅनरा बँकेत दाखल केले. त्यानंतर सिंग यांच्या नावाने (खाते क्र 110120132151) नव्याने उघडून रिलायन्स निप्पाॅन कंपनीस सिंग यांच्या पॉलीसी क्र. 52850390 व पॉलीसी क्र.52844203 च्या सरेंडरची प्रक्रिया पूर्ण करत १९ लाख ३८ हजार ८०४ रुपये परस्पर वटवून रकमेचा अपहार केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा