Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमालगाडीच्या टँकर मधील इंधन चोरी उघडकीस

मालगाडीच्या टँकर मधील इंधन चोरी उघडकीस

रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई

मनमाड । बब्बू शेख Manmad

येथील रेल्वे सुरक्षा दलाने इंधनाची वाहतूक करणार्‍या रेल्वेच्या इंधन वाहून नेणार्‍या मालगाडीच्या टँकर मधून केली जाणारी पेट्रोल-डिझेल चोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी 6 इंधन चोरांना रंगेहात पकडण्यात आले असून इंधन चोरी प्रकरणात पकडण्यात आलेले सर्व संशयित रेल्वे कर्मचारी असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सुरक्षा दलाने ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून चोरलेले पेट्रोल, डीझेल सोबत इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहाही जणांविरूध्द आरपीएफ ने गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, यापुर्वी टँकरमधून इंधन चोरी केली जात असल्याचे उघडकीस येत होते. आता थेट रेल्वे रॅकच्या टँक मधून पेट्रोल डीझेल चोरी व ती देखील रेल्वे कर्मचार्‍याच्या माध्यमातून केली जात असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडून इंधन चोरी करणारे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असल्याने याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने खोलात जाऊन तपास केल्यास बडे मासे हाती लागतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मनमाड पासून जवळ इंडिया ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदी कंपन्याचे इंधन साठवणूक प्रकल्प आहे. या प्रकल्पात मुंबई येथून पाइप लाईनच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल आणले जाते त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागातील पेट्रोलपंपाना टँकरच्या तर देशातील काही राज्यात ऑयल कंपन्यांच्या प्रकल्पात रेल्वे टँकर रॅकच्या द्वारे इंधन पुरवठा केला जातो.

इंधन घेऊन जाणारे रेल्वे रॅक प्रकल्पाला खेटून असलेल्या पानेवाडी रेल्वे स्थानका जवळ उभ्या केल्या जातात रेल्वे स्टेशनच्या हद्दीत पानेवाडी यार्डात उभ्या असलेल्या वॅगन मधून मोठया प्रमाणात पेट्रोल, डिझेलची चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर पानेवाडी यार्डसाठी सीपीडीएस टीमचे निरीक्षक नीलेश सोमवंशी यांच्यासह विठ्ठल नागरे, चतुर मासुळे, नारायण बागुल, समाधान गांगुर्डे आदीच्या पथकाने सापळा रचून छापा मारला असता त्यांना उभ्या रेल्वेच्या टँकर मधून काही जण पेट्रोल,डिझेल काढत असल्याचे आढळून आले.

या पथकाने वॅगनमधून इंधन चोरी करण्याच्या आरोपाखाली पॉईंट्समॅन प्रवीण सयाजी शिंदे (वय 31, रा.न्यू, पांझण), अजय धूप सिंग यादव (वय – 24 वर्ष, रा.शांतिनगर), गोकुल कृष्णा सुरसे (वय 34 वर्ष, रा. साकोरा), सिध्देश्वर उल्हास शहरकर (विभाग वाणिज्य वय 37, वागदर्डी, मनमाड), हेल्पर शुभम लक्ष्मण तुरकने (वय 28, पानेवाड़ी) आणि रवीद्र निवृत्ती आहेर (विभाग उथ ग्रेड रा. क्रांती नगर) या 6 रेल्वे कर्मचार्‍यांना रंगेहात पकडत त्यांच्याकडून सुमारे 36 लिटर डिझेल, 11 लिटर पेट्रोलसह 5 लहान, मोठे प्लास्टिकचे डबे,1 प्लास्टिकची बाटली, दुचाकीं वाहनांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे विशेष म्हणजे सर्व कर्मचारी ऑन ड्युटी असताना इंधन चोरी करत होते.

इंधन चोरी प्रकरणात तब्बल सहा कर्मचार्‍यांना पकडण्यात आल्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यां मध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास आरपीएफ निरीक्षक देसवाल यांच्या मार्गदर्शना खाली आरपीएफ उपनिरीक्षक आर.एस.यादव करीत आहे. या अगोदर एक वर्षा पूर्वी याच पानेवाडी येथून रेल्वेच्या वॅगन मधून अशाच पद्धतीने इंधन चोरताना रेल्वे कर्मचार्‍यांला पकडण्यात आले होते.एक वर्षा पासून बंद असलेली इंधनचोरी पुन्हा सुरु झाली असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

चोरलेले इंधन कोणाला विकले जाते, तसेच मनमाडच्या पानेवाडी येथे हा प्रकार सुरू आहे तर देशातील इतर ठिकाणी देखील असाच चोरीचा प्रकार होत असेल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बलाने खोलात जाऊन तपास केल्यास इंधन चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

इंधन चोरी आणि अवैध विक्री यातून 2011 साली अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्याची घटना घडली होती. या घटने नंतर काही काळासाठी इंधन चोरी,अवैध विक्रीवर काही प्रमाणात आळा बसला होता मात्र अधून-मधून पुन्हा अशा घटना घडू लागल्या आता तर थेट रेल्वे रॅकच्या टँकमधून इंधन चोरी केली जात असल्याचे उघडकीस आल्यामुळे इंधन चोर पुन्हा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे

अशी केली जात होती इंधन चोरी

वॅगनच्या मध्यभागी मोठा पाईप असतो त्याला दोन्ही बाजुंनी व्हॉल् असतात हे व्हॉल् सील केलेले असतात. इंधन चोरांनी या सीलला हात न लावता पेट्रोल डिझेल चोरण्यासाठी वेगळी शक्कल लढवली असून चोरटे दोन्ही व्हॉलचे नट थोडे लूज करतात नट लूज केल्यावर व्हॉल् मधून इंधनची मोठ्या प्रमाणात गळती होते एका व्हॉल्मधून पेट्रोल,डिझेलची धार सुरू होते व्हॉलच्या खाली डबे ठेवून इंधन घेतले जाते. एक रॅक सुमारे 50 ते 55 डब्याची असते आणि एका वॅगन मध्ये 65 किलो लिटर इंधन असतो. चोरी पकडली जाऊं नये म्हणून चोरटे एका वॅगन मधुन फक्त 15 ते 20 लिटर इंधन चोरतात. 55 डब्यातून एका वेळेस 1 हजार लिटर इंधन चोरी केले जात असल्याचे बोलले जाते आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या