Wednesday, June 26, 2024
Homeनगरफर्निचर करून देण्याच्या नावाखाली अडीच लाखाला चुना

फर्निचर करून देण्याच्या नावाखाली अडीच लाखाला चुना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

घरातील फर्निचरचे काम करून देण्याच्या नावाखाली धनगरवाडी (ता. नगर) येथील तरुणाची दोन लाख 38 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महेश बिरोबा पादीर (वय 29 रा. धनगरवाडी) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 8 मे) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील एका व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

रघु केशवराव महाले (रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरचा प्रकार 3 सप्टेंबर 2023 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे. पादीर यांना घरातील फर्निचरचे काम करायचे असल्याने त्यांनी महाले याला काम देऊन गुगल पे वरून एक लाख 70 हजार रुपये दिले होते. त्यानंतर महाले याने पादीर यांच्या घरी येऊन त्यांच्या वडिलांकडून 50 हजार रुपयांची रोकड नेली होती. तसेच दसर्‍याच्या दिवशी (25 ऑक्टोबर 2023) तो पुन्हा घरी आला व पादीर यांच्या वडिलांकडून 18 हजार रुपये घेऊन गेला होता. असे एकूण दोन लाख 38 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स दिले होते.

दरम्यान त्यानंतर पादीर यांनी महाले याला वारंवार फोन केले असता तुमचे काम करून देतो असे म्हणून वेळ मारून नेली. नोव्हेंबर 2023 मध्ये पादीर यांचे महाले सोबत बोलणे झाले असता तुमचे काम दोन दिवसांत करून देतो असे सांगितले होते. त्यानंतर पादीर यांनी महालेला वारंवार फोन केला असता त्याने त्यांचे फोन घेतले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पादीर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या