Friday, October 23, 2026
HomeनगरAhilyanagar : नगर शहरात श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना

Ahilyanagar : नगर शहरात श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना

घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात || एसपी मुम्मका यांच्या हस्ते विशाल गणपतींची पुजा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शनिवारी रात्रीच्या भूरभूर पावसानंतर रविवारी मिळालेली उघडीप आणि उन्हाच्या कडाक्यात सोमवारी सकाळी 11 नंतर नगर शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाला धडाक्यात सुरुवात झाली. यंदा पावसाचे प्रमाण थोडे कमी असले, तरी भाविकांच्या मनातील बाप्पांची श्रद्धा आणि उत्साह तीळभरही कमी झालेला दिसला नाही. पुढील 12 दिवस आता संपूर्ण नगर शहर उत्सव आणि उल्हासाने भारावून जाणार आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरची मुख्य बाजारपेठ फुल्ल झाली होती. वेगवेगळ्या आकारातील, आकर्षक आणि कलात्मक श्रींच्या मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. यासोबतच पूजा साहित्य, दुर्वा, फुले आणि सजावटीच्या साहित्याला (माळा, रोषणाई, मखर) प्रचंड मागणी दिसून आली. नागरिकांनी उन्हाची पर्वा न करता खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. दरम्यान, अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते सोमवारी अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात श्रींची प्राणप्रतिष्ठापना विधीवत पार पडली. फुलांची सुंदर आरास आणि झगमगत्या विद्युत रोषणाईने सजवलेल्या मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. याप्रसंगी रुद्रवंश ढोल पथकाने सादर केलेल्या वादनाने वातावरण अधिकच चैतन्यमय करून सोडले.

या सोहळ्यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरीचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा. माणिकराव विधाते, संजय चाफे, नितीन पुंड, शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसें, कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखानाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह, श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत म्हणून विशाल गणेशाची ओळख केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक एकतेचे प्रतिक आहे. मंदिरात होत असलेले कार्यक्रम ही भाविकांना एकत्र आणणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी पर्वणी आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शिस्त, सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. भक्तांनी शांततेत आणि आनंदात सण साजरा करावा. पोलीस विभाग नेहमी समाजाच्या सोबत उभा आहे. देवस्थानचे अध्यक्ष आगरकर यांनी सांगितले की ग्रामदैवत श्री विशाल गणेश हे अहिल्यानगरकरांचे आस्थेचे केंद्र आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही श्रींच्या कृपेची प्रचिती आहे. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात व एकतेने साजरा करावा, हेच श्रींचे खरे आशीर्वाद मानले जातील. गणेशोत्सवानिमित्त श्री विशाल गणेश देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रुद्रवंश ढोल पथकाने आपली कला सादर केली. मंदिर परिसरात फुलांच्या सजावटीसोबतच विद्युत रोषणाईने सजवलेली कलाकृती विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.महिला व युवक मंडळांनी स्वयंसेवक म्हणून व्यवस्था सांभाळली. संपूर्ण परिसरात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

आता 12 दिवस उत्सव आणि उत्साह!
नगर शहरातील संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आणि डीजे व ढोल-ताशांच्या गजराने भारावून गेला आहे. मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई भक्तांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. महिला व युवक मंडळांच्या स्वयंसेवकांनी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी उत्तम व्यवस्था सांभाळली आहे. आजपासून पुढील 12 दिवस नगर शहर पूर्णपणे भक्ती, उत्सव आणि उत्साहाच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.

बाजारपेठेत खरेदीसाठी अभूतपूर्व गर्दी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील बाजारपेठ सोमवारी सकाळपासूनच हाऊसफूल झाली होती. पूजेचे साहित्य, दुर्वा, फुले, आणि पत्री खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांवर प्रचंड गर्दी केली होती. शहरातील माळीवाडा, कापड बाजार, दिल्ली गेट, नेप्तीनाक, सावेडी, भिस्तबाग चौक, पाईपलाईन, तपोवन रोड, नागापूर एमआयडीसी, सह्याद्री चौक, यासह शहरातील प्रमुख भागात गणेश मुर्ती, पुजा साहित्य आणि सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते.

सजावटीच्या साहित्य आणि वेगवेगळ्या मिठाई
बाप्पाच्या स्वागतासाठी मखर, रोषणाईच्या माळा, विविध प्रकारची सजावटीची पाने-फुले आणि पर्यावरणपूरक साहित्यांची खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची लगबग पाहायला मिळाली. दुकानदारांनीही ग्राहकांसाठी विविध कलात्मक पर्याय उपलब्ध करून दिले होते. यासह विजेच्या माळी, अन्य साहित्य यांची मोठी रेलचेल नगरच्या बाजारपेठ उपलब्ध होती. यासह बाजारपेठेत यंदा वेगवेगळी मिठाई उपलब्ध होती. यंदाच्या मिठाईवर अन्न औषधचे लक्ष असल्याने यंदा बाप्पांचा प्रसाद भेसळीपासून रोखला गेला.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ ऑक्टोबर २०२६ – सामाजिक संघर्षाच्या मेळाव्यांची मांदियाळी

0
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दसरा मेळाव्यांना ऐतिहासिक महत्त्व असले, तरी यंदाचे मेळावे पारंपरिक शक्तिप्रदर्शनापेक्षा स्फोटक राजकीय व सामाजिक संघर्षाचे केंद्र ठरले. शिवसेना शिंदे आणि ठाकरे...