Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधगणेशोत्सव : सामाजिक भान सजग करणारा लोकोत्सव

गणेशोत्सव : सामाजिक भान सजग करणारा लोकोत्सव

जग एका भयंकर अश्या कोरोनो (Corona)त्रासदीतून बाहेर पडू पहात आहे. ह्या शतकातली सर्वात मोठी वैश्विक आपत्ती आपण सार्‍यांनी अनुभवली आहे. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. जग लॉकडाऊनमधून (Lockdown) हळू हळू मुक्त होत असून मोकळा श्वास घेत आहे. या परिस्थितीतही आपल्या सर्वांच्या डोक्यावर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भूत घोंघावत आहे. या परिस्थितीत सार्‍यांची विघ्न हरण करणार्‍या गणरायाचं आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री गणेशोत्सवाचे स्वरुप काल-आज आणि उद्या या तिन्ही पातळीवर चिंतन करणे महत्वाचे आहे. सण – उत्सव साजरे करतांना समाजभान महत्वाचे असते. ते जपले तरच गणेशोत्सव एक सामाजिक उत्सव (Social celebration) आहे असे आपणास म्हणता येईल.

श्री गणेशोत्सवाचा मूळ उद्देश –

भारतात पूर्वापार, परंपरेनेच श्री गणरायाची पूजाअर्चा करण्यात येत आहे. पूर्वी प्रत्येकाच्या देव्हार्‍यात माजघरात गणरायाची स्थापना, पूजा केली जायची. श्रीगणेशाला ग्रामदेवतेचाही मान होता. वेद, उपनिषद, अथर्वशीर्ष, व्यासपुराण, श्री गणेश पुराण, ज्ञानेश्वरी या सार्या ग्रंथांमधून श्री गणेश महिमा वर्णन केलेला आहे. श्री गणेशाची आठ रुपं ही स्वयंभू असून, ती सर्व महाराष्ट्रातच आहेत हे विशेष. त्यांना अष्टविनायक असे म्हणतात. शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी स्वतः लक्ष घालून श्री गणेश देवस्थानांचे महत्व वाढवले.

- Advertisement -

1818 साली पेशवाई गेली आणि इंग्रजांचा अंमल सुरु झाला. इंग्रज आले आणि आपण पारतंत्र्यात पडलो. इंग्रजांचे अन्याय अत्याचार सुरू झाले. वेठबिगार गुलाम म्हणून जगणे नशिबी आले. त्या काळी प्रत्येकाला स्वातंत्र्याची स्वप्न पडू लागली. त्यासाठी उठाव, लढे सुरू झाले. इंग्रजांच्या कठोर शासनापुढे ते तोकडे आणि असमर्थ ठरू लागले. अशा वेळी 1883 साली, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

श्री गणेशाला त्यांनी घरातून सार्वजनिक जागेवर आणले. लोकांनी निर्धोक, निर्भिडपणे एकत्र यावे, पूजा-अर्चा करावी, संघटित व्हावे हा यामागचा उद्देश होता. उत्सवाच्या निमित्ताने जनजागृती, चेतना निर्माण करणारी व्याख्यानं व्हायची. मेळे लागायचे, सभा घेतल्या जायच्या. त्या काळी प्रसारमाध्यमे व मनोरंजनाची साधनेही कमी होती. यामुळे तरुणांचाही गणेशोत्सवाकडे ओढा असायचा. कुस्त्यांचे कार्यक्रम, पोवाड्याचे कार्यक्रम, बौद्धिक भाषण यामुळे समाजमन ढवळून निघायचे. माणसं इंग्रजांविरुद्ध पेटून उठायची.

स्वातंत्र्यासाठी तरुण पेटून उठायचे. बघता बघता गणेशोत्सवाने मोठे स्वरूप धारण केले. या उत्सवाचे चांगले परिणाम दिसू लागले. जनमत संघटित होऊ लागले. विचार करू लागले. पेटून उठू लागले. स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली. गणेशोत्सव सुरू करण्यामागचा टिळकांचा उद्देश स्पष्ट होता त्यांना पूजा आर्चाचे स्तोम नको होते. दिखाऊ बाजारूपण नको होते. निव्वळ उत्सव नको होता. त्यांना हवे होते, त्या मागचं सुप्त संघटन. प्रबोधन आणि चेतना जागृती. ते त्यांनी सहज साधल. 1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारतात श्री गणेश गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर राहून गेला. त्याला दिखाऊपणा आला. परंपरेने चालत आलेला उपक्रम एवढेच स्वरूप त्याचं राहिले.

श्रीगणेशाचे गुणदर्शन अवयव –

खरंतर श्री गणेशाच्या रूपातून मनुष्य आणि प्राणी यांचा कल्पनातीत संयोग साधला गेला आहे. त्यांच्या प्रत्येक अवयवातून वेगवेगळ्या गुणविशेषाचे दर्शन घडते. श्रीगणेशाचे विशाल डोके प्रखर, प्रगल्भ बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. बारीक डोळे सूक्ष्म दूरदृष्टीचे प्रतीक आहे. चोहीकडे हलणारी सौंड ही चापल्याची प्रतिक आहे.

सुपासारखे दिसणारे कान हे बहुश्रुततेचे प्रतीक आहे. गणेशाचा मोठेपोट सर्वसमावेशकतेचं प्रतीक असून, भक्तांच्या चुका, अवगुण तो याच पोटात सामावून घेतो अशी भक्तांची धारणा आहे. श्री गणेशाची जी आठ रुपं आहेत, ती सर्व महाराष्ट्रातच आहेत. ज्यांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो. त्यात मोरगावचा श्री मयुरेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर, महडचा श्री वरदविनायक, थेऊरचा श्री चिंतामणी, लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि रांजणगावचा श्री महागणपती यांचा समावेश होतो.

श्री गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप –

सद्यपरिस्थितीत गणेशोत्सवाचा मूळ उद्देश हरवल्याने त्याला दिखाऊ, बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. याला सामाजिक बांधिलकी जपणारे काही गणेशोत्सव मंडळांचा सन्माननीय अपवाद आहे. ते नाकारता येणार नाही. सर्वसामान्यपणे गणेशोत्सव मात्र भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, मंडपाचे अक्राळविक्राळ आकार, रोषणाई, कर्णकर्कश डिजे, साऊंड सिस्टिम आणि विसर्जनाच्या भव्यदिव्य मिरवणुका यांच्या गराड्यात अडकून पडला आहे. लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी आणि कलेला लोकाश्रय देण्यासाठी हे आवश्यक असले, तरी यामुळे उत्सवातला राम निघून गेल्यात जमा आहे.

एवढ्या प्रचंड प्रमाणावर उत्सव साजरा करायचा म्हटला म्हणजे पैसा हा लागणारच. त्यासाठी वर्गणी आली. त्या पाठोपाठ वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते आले. सहज कुणीही वर्गणी देत नाही. मग, त्यातून दादागिरी, राजकीय वर्चस्व, गुंडांचे सहकार्य हे ओघाने आलेच. वर्गणी गोळा करणार्‍यांच्या श्रमपरिहारही वर्गणीतूनच होतो, हे वेगळे सांगायला नको. ज्या भागात हा उत्सव असतो, तेथील रहिवाशांना आवाजाचा, वाहतुकीचा, वर्गणीचा आणि गर्दीचा त्रास मारून मुटकून सहन करावा लागतो.

उत्सवानंतर निर्माण होणार्‍या समस्या –

उत्सवातला आनंद-उत्साह-उल्हास अनंत चतुर्थी पर्यंत टिकतो. यानंतर खर्या समस्या निर्माण होतात. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन ही त्यातली मुख्य समस्या. गावागावात शहरात असंख्य मंडळी श्रींची स्थापना करतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर मूर्तीचे विसर्जन करताना, पाण्याचे प्रदूषण होते. गणेशा मूर्तींची प्रचंड मागणी असल्यामुळे, मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात. त्यांना कृत्रिम रंग दिले जातात. अशा मुर्त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यांचे अवयव तुटून त्यांची विटंबना होते. रंग पाण्यात विरघळून ते दूषित होते. उत्सवानंतर मंडपाच्या जागी, रस्त्यांवर खड्डे तयार होतात. देखाव्यामुळे निर्माण झालेला कचरा, कित्येक दिवस पडून असतो. विसर्जनाची मिरवणूक प्रतिष्ठेची केली जाते.

यातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतं. दोन दोन दिवसा पर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू असते. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर अनावश्यक ताण पडतो. मिरवणुकीत गुलाल प्रदूषण तर करतोच प्रसंगी धार्मिक कलह देखील वाढतो. यातूनच धार्मिक तेढ वाढू शकतात. समाजमन अस्वस्थ होतं. भिती व अशांतता निर्माण होते. प्रचंड प्रमाणावर पैश्यांचा चूराडा होतो. कित्येक दिवस कार्यकर्ते श्रम करतात. शाळा, महाविद्यालये, दवाखाने यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो तो त्रास वेगळाच.

काळानुरूप बदल स्वागतार्ह –

काळ बदलला तसा उत्सवातही बदल अपेक्षित आहे. समाजात अंधश्रद्धा, लोकसंख्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी यासारख्या असंख्य समस्या देशात आहेत. या संबंधित समस्यांकडे डोळेझाक करून, मोठे उत्सव साजरे करणे, म्हणजे उत्सवात आपले वास्तव, दुःख लपवण्यासारखे आहे. श्री गणेशोत्सवात जनप्रबोधनाचा महत्त्वाचा दुवा आपल्या हातात असतो. याचा सकारात्मक वापर करून घ्यायला हवा. आजही देशातील जनतेला प्रबोधनाची गरज आहे. प्रत्येकाला आपला धर्म, आपला उत्सव मान्य करायला सांगा. मात्र, असे उत्सव साजरे करताना, त्याला कालोचित भान असायला हवे. नवीन बदल स्वीकारायला हवेत. यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पाऊल उचलले आहे.

त्यांचा एक गाव एक गणपती व मूर्तीदान या योजना यशस्वी होत आहेत. त्यामुळे पैशांचा अपव्यय, ध्वनी – जल प्रदूषणाची समस्या, वाहतूक समस्या, मूर्तीची विटंबना यासारख्या समस्या सहज टाळता येणार आहेत.

उत्सवात जमा झालेले निर्माल्य, विसर्जित न करता, त्याचा नैसर्गिक खत म्हणून उपयोग करता येईल. यातून प्रदूषण थांबेल व उपयुक्तता वाढेल. टाकाऊतून टिकाऊ म्हणतात ते यालाच. उपद्रवमूल्य टाळून उपयुक्तता वाढवता आली तरच सण, उत्सव काळाच्या कसोटीवर खरे उतरतील.

उत्सवाला राजकारणाचे पाठबळ –

हल्ली पक्षा पक्षांचे देखील गणेश मंडळ बघायला मिळतात. पक्षाची बांधिलकी मानत असे मंडळं, विरोधकांवर विखारी टीका करणारे देखावे साजरे करतात. वेळप्रसंगी प्रक्षोभक भाषणांचे आयोजन केले जाते. लोकांनाही अशा प्रकारचे सवंग कार्यक्रम हवेच असतात. मात्र, यातून गटागटात, जाती धर्मात ठिणगी पडून समाजविघातक घटनाही घडू शकतात. हे सारे टाळण्यासाठी राजकीय व्यक्तीला त्याचा पक्ष, धर्म, जात यांची पादत्राणं गणेशोत्सवा बाहेर काढायला लावायला हवीत. तरच, उत्सवाचा निकोप हेतू साध्य होऊ शकेल. राजकीय पुढार्‍यांनी मोठ्या देणग्या देऊन तरुणांना पार्टी कल्चरची देणगी दिली आहे. यातून भोगवादी संस्कृती वाढत असून, हे धोकादाय आहे.

यापेक्षा त्या पैशाचा समाजोपयोगी, विधायक कार्यासाठी उपयोग करायला हवा. गरीब विद्यार्थ्यांना ड्रेस, वह्या-पुस्तकं, स्कॉलरशिप असे उपयोगी पर्याय करता येतील. सध्या समाजामध्ये स्पर्धा परीक्षांचा ट्रेंड आलेला आहे. या स्पर्धांसाठी खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थी, आपले नशीब आजमावण्यासाठी शहरांमध्ये येतात. अशा विद्यार्थ्यांना शहरांमध्ये निवासासाठी व्यवस्था झाली, त्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका मिळाली, त्याचप्रमाणे अभ्यासासाठी लागणारी पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध झाली तर त्यांचं भविष्य उजळू शकते.

अशा कामासाठी राजकीय नेत्यांनी पुढार्‍यांनी गणेश मंडळांनी आपल्या मंडळाचा पैसा तिथं वापरायला हवा. तर, तरुणाला योग्य दिशा मिळेल. त्याला नोकरीची संधी उपलब्ध होईल. त्याचं भविष्य उज्वल होऊ शकेल. आणि, त्यातून आपल्याला, समाज उन्नत दिशेकडे नेता येईल.

उत्सवाला नवा उद्देश हवा –

जगण्यासाठी मानसांना सण – उत्सवांची गरज असते. सर्वसामान्य माणूस अशा सार्वजनिक उत्सवातून त्याच्या हरवलेले आनंदाचे क्षण शोधत असतो. आपली उभारी जपत, दैनंदिन जीवनात या अडचणींवर मात करत, तो व्यवस्थेत सहभागी होतो. त्याच्या आयुष्यात, काही बदल करता आला, तर या गणेश मंडळांनी करायला हवा. त्याचं जगणं सुकर करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. पिण्याच्या पाण्याची सोय, परिसरातील स्वच्छता, शासकीय कामातील सुलभता, संगणकाची तोंडओळख, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग असे कितीतरी अभिनव उपक्रम गणेशोत्सवाच्या प्रचंड देणग्यांमधून वर्षभर राबवत येतील.

श्री गणरायाला अर्पण केलेल्या लाखो रुपयातून अशी विधायक कामे उभी राहिली, तर उत्सवाला नवा उद्देश प्राप्त होईल. अनेक मंडळे समाजहिताची कार्य करीत आहेत. मात्र, त्यांची संख्या खूप कमी आहे. मूळ उद्देश हरवलेल्या गणेशोत्सवाला, नवा उद्देश सापडायला हवा. म्हणजे, हा उत्सव काळाच्या पडद्याआड जाणार नाही. गणेशोत्सव मंडळांनी दवाखाने समृध्द करायला हवेत.

शक्य झाले तर ऑक्सिजन प्लांट सक्षम करावेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी लसीकरणात मदत करावी. कोरोना योध्दा म्हणून, अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिसांना सन्मानित करता येईल. वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेऊन, रोपांचे वाटप, वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण करणार्‍यांना पुरस्कार सुरू केल्यास, ही धरा हिरवीगार करता येईल.

वातावरणातील ऑक्सिजन वाढवता येईल. निसर्गातील जलचक्र सुरळीत ठेवता येईल. गावागावात स्वच्छता मोहिम राबवता येईल. शहरं, गांवं सुंदर करता येतील.

गणेशोत्सवाला कोरोनाचे आव्हान –

शासनाने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केल्यामुळे, गाव व शहर ओस पडली. शासनाच्या सूचना आपण पाळायलाच हव्यात. ते आपलं प्रथम कर्तव्यच आहे. शासन, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय सेवा, पोलिस प्रशासन, या प्राणपणाने कार्यरत आहेत. त्या जनतेसाठी जीव धोक्यात टाकून आपलं काम करतच आहेत. आपण फक्त त्यांना साथ द्यायला हवी. त्यांचा ताण वाढवू नये हा संदेश गणेशोत्सवांनी दिला पाहिजे. कोरोना हा संसर्गजन्य असून, तो गर्दीच्या ठिकाणी संपर्कातून, स्पर्श झाल्याने वेगाने पसरतो.

गणेशोत्सवादरम्यान पावसाची रिपरिप सतत सुरू राहण्याची दाट शक्यता असते. पुण्या-मुंबई सारख्या महानगरातील गणेशोत्सव लाखोंची गर्दी खेचतात. हे वातावरण कोरोनाला पोषक ठरू शकते आणि समस्त मानवाला धोक्याचे ठरु शकते.

याच काळात तिसरी लाट येण्याची भयसूचक शक्यता आहे. तिचं गाभिर्य आपण ओळखायला हवं. उत्सवादरम्यान योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही, तर रोगाचा प्रसार थांबविणे केवळ अशक्य होईल. हे टाळण्यासाठी मंडळांनी भव्य, आकर्षक आरास टाळावी.

गर्दी कशी कमी ठेवता येईल यावर लक्ष द्यावे. माणसं सुरक्षित राहण्यासाठी मास्क वितरित करावेत, सोबत मुबलक प्रमाणामध्ये सॅनिटायझरचा वापर करावा. माणसामाणसांमध्ये अंतर ठेवावं. अल्पदरात तपासण्या उपलब्ध करून द्याव्यात. महाआरत्या शक्यतो टाळाव्यात. एखाद्या गणेश मंडळाला श्री गणरायाच्या मूर्तीला, तोंडावर मास लावण्याचा मोह पडू शकतो. तसा तो पडावाच.

असा मास्क लावलेला बाप्पा देखील, सामान्य माणसाचं प्रबोधन करू शकेल. बदललेल्या परिस्थितीचे प्रतिबिंब उत्सवातील देखाव्यातून प्रकट व्हायलाच हवे. मंडळांना याचे भान आहे हे समाजाला दिसायला हवे. तरच, आपण सुजाण आहोत आणि श्री गणेश उत्सवाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल !

– देवरुप, नेताजी रोड,

धरणगाव. जि. जळगाव – 425105.

काव्यानंद पुरस्कार प्रा.बी.एन.चौधरी (धरणगाव) यांच्या या लेखाला, पुणे येथील काव्यानंद प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत खुल्या गटात, प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. द्वितीय क्रमांक सायली वैद्य (मुंबई) तर तृतीय क्रमांक प्रतिमा काळे (पुणे) यांना मिळाले आहेत. स्पर्धेत महाराष्ट्रातून 43 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुरस्कार वितरण डिसेंबरमध्ये एका जाहीर समारंभात होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी कळवले आहे. – संपादक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या