Friday, November 22, 2024
Homeनगर…अखेर सातव्या दिवशी गणोरेतील उपोषण स्थगित

…अखेर सातव्या दिवशी गणोरेतील उपोषण स्थगित

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आश्वासन

गणोरे |वार्ताहर| Ganore

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रविवारी (दि. 7 जुलै) स्थगित करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येवून उपोषणकर्ते शुभम आंबरे आणि संदीप दराडे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली. याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, शिवाजी धुमाळ, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून त्यांच्या मागण्यांबाबत सरकारला निश्चितच सहानुभूती आहे. आता अनुदानासाठी घातलेल्या सर्व अटी काढून टाकण्यात आल्या असून, राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात हे अनुदान वर्ग करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे विखे पाटील म्हणाले. दूध दराच्या बाबतीत सर्व खासगी आणि सहकारी संघ चालकांसोबत झालेल्या बैठकांची माहिती देवून उसाप्रमाणे दुधालाही आधारभूत किंमत मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

आधारभूत किंमतीबाबत त्यांनी सकारत्मकता दर्शवली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्य मंत्रीमडळाच्या बैठकीत सर्वांनी तीस रुपये दर आणि पाच रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आता अमंलबजावणी करून घेणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात खाद्य उत्पादकांसोबत बैठक घेताना शेतकरी प्रतिनिधींना बोलावण्याची मागणी विखे पाटील यांनी मान्य केली. त्यानुसार येत्या आठवड्यातच ही बैठक घेण्याचे मान्य केले आहे. राज्य सरकारने आत्तापर्यंत अनुदानापोटी 231 कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय केला. यापैकी 60 कोटी रुपयांचे राहिलेले अनुदानाचे वितरण 15 जुलैपर्यंत होणार असून अहमदनगरमधील 92 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात 82 कोटी रुपयांचे अनुदान वर्ग झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या