धामोरी (वार्ताहर)
सर्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आतुरतेने ज्याची सर्वजण वाट पाहत असतात त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपले आहे.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. परंतु दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा सरकारने उत्सव निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील मूर्तीकार सोमनाथ मोरे व बाळासाहेब मोरे गणेशोत्सवाकरिता लागणार्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत असून मूर्ती अधिक आकर्षक बनविण्यात व्यस्त आहेत. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरले जाते. गणेशमूर्ती आकर्षक रंगवण्यासाठी पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे.
गणपती बनवताना लागणारा कच्चा माल, कारागिरांच्या मानधनात वाढ, रंग, काथ्या, दाग-दागिन्यांची सजावट तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस या साहित्यात यंदा सर्वच गोष्टीत महागाई झाल्याने मूर्तींच्या किमतीतही दहा ते वीस टक्के वाढ होणार आहे.
6 इंचापासून ते 7 फुटापर्यंत मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत. गणेश मूर्तीमध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, सावकार, टिटवाळ्याचा गणपती असे विविध आकर्षक डिझाईनचे गणपती बनविण्यात आले आहेत. आता करोनानंतर मोठ्या उत्साहात साजर्या होणार्या या सणाची सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. दोन वर्षांपासून मूर्तिकारांना आपल्या व्यवसायात होणारी हानी यावर्षी नक्की भरून निघेल, अशी आशा मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.