मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..
स्वरात पुंगी करात परडी
दारात येई गारुडी
फणा काढूनी दर्शन देई
नागोबाची उघडे परडी
मुला-मुलांनो चला चलानागोबाला बघायला
असे म्हणत संजय मुलांना घेऊन गारुडीच्या दिशेने निघाला. गारुडी दिसतात संजय मुलांना सांगू लागला..
पूर्वी नागपंचमीला गारुडी सर्वत्र फिरत. पण आता हीदेखील लोककला अनेक कारणांमुळे जवळपास संपुष्टात आली आहे.
नागपंचमीच्या दिवशी बंद टोपल्यांमधून नागास घेऊन येणारा नागवाला म्हणजेच नागांना घेऊन फिरणारा गारुडी. हा गारुडी नागोबाला दूध द्या म्हणून विनंती करतो. चिन्मयने बाबांना विचारले, हा गारुडी फक्त नागपंचमीलाच यायचा का? संजय सांगू लागला, नाही, नाही, गारुड्यांची मजाच वेगळी. तुम्हाला त्यांची सर्व माहिती सांगतो. गारुडींचा मुख्य व्यवसाय म्हणजे साप व नाग पकडणे. त्यांना परडीत ठेवणे. मग ते वेगवेगळ्या गावांना जातात. बासरी, ढोलकी, पुंगी, कटोरा असे सामान असते. ढोल वाजवून लोकांना जमा करतात. प्रथम मुलेबाळे येतात नंतर हळूहळू मोठी माणसे जमा होतात. एका गावातून दुसर्या गावात जाणार्या गारुडीचा हा व्यवसाय होता.
नागपंचमी हा सण असल्यामुळे नागपंचमीला त्याचे महत्त्व अधिक असते. दूध, लाह्यांचा नैवेद्य, पुरणाचे दिंडे हे वैशिष्ट्य या दिवसाचे असते. सुवासिनी नागोबाची पूजा करतात. परंतु हे फक्त ‘नागपंचमी’पुरते मर्यादित नसायचे तर नियमित गारुडी नाग, सापांना घेऊन फिरत असतात. ते दारोदार जायचे किंवा गावाच्या एखाद्या मैदानावर जमायचे. त्यांच्या ढोलकीचा आवाज आला की सर्वजण जमा होतात. मग ते आपला खेळ सुरू करायचे. डालगीत त्यांचे सामान असते, तर टोपलीत नाग, साप, अजगर, मुंगूस असे प्राणी असायचे. मोकळ्या मैदानावर जायचे तेव्हा दोन-चार पेटारे व साप, नाग ठेवलेले असायचे. एखादा बिनविषारी साप मोकळा सोडलेला असायचा. पुंगी वाजवून नागाला बोलवणे नंतर साप व मुंगुसाची लढाई लावणे, असेही खेळ गारुडी करायचे. बराच वेळ झाला की सापाला करंडीत बंद करायचेे. मुलांनो, साप गारुडी यांचे अजून वैशिष्ट्य म्हणजे आपले खेळ सुरू करताना जादूगाराच्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरे देणे, पत्त्यांची जादू, रुमाल, रिबीन, रुपयाचे नाणे वगैरे अदृश्य करण्याचे खेळ करतो. नंतर हंडीबागला झोपवून त्याच्यावर चादर अंथरतो. नंतर तो प्रेक्षकांच्या पैकी कोणाच्याही खिशात काय आहे ते विचारतो, उत्तरे अचूक आल्यानंतर लोकांचा साप-गारुड्यावर विश्वास बसतो. नंतर तो कुठले तरी दंतमंजन, औषध विकायला काढतो आणि शेवटी कटोरा घेऊन प्रेक्षकांकडून पैसे जमा करतो. गारुडी हा गावाकडेच नाही तर शहरातल्या लोकांचीही अल्प पैशातील करमणूक होती. आता ती फारशी राहिली नाही.
सापांचे खेळ करून दाखवणे हाच त्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय होता. गारुड्यांचा व्यवसाय प्राचीन काळापासून असावा, असे गरूड पुराणात आलेल्या उल्लेखावरून दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे लोक होते. तेव्हा लाठीकाठी शिक्षण घेऊन लढाईच्या प्रसंगी ते ठामपणे उभे राहत असत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची लहानपणची एक आठवण सांगितली जाते. त्यांचे मूळ नाव ‘माणिक बंडोजी इंगळे’. यांनी एकदा खंजिरीवर भजन गाताना ऐकले खंजिरीची उत्सुकता त्यांना निर्माण झाली. घरातील एका मडक्याला कागद लावून त्यांनी खंजिरी बनवून वाजवण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान गावात गारुडी आले. खंजिरीच्या तालावर खेळ दाखवत असताना माणिक यांची नजर त्यावर गेली. घरातली भाकरी देऊन त्यांनी ती खंजिरी मिळवली असे म्हणतात. त्यांनी ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, स्वावलंबन, स्वसंरक्षण, आरोग्यवर्धक जीवनशैलीचे धडे खंजिरीवरील भजनांमधून रुजवली.
गारुडी वाजवत असलेल्या पुंगीला उत्तरेकडे ‘बीन’ म्हणतात. फार पूर्वी साप चावल्यास विष उतरवण्यासाठी गारुडींना बोलावले जायचे, असे म्हणतात. अतिशय विषारी समजल्या जाणार्या साप आणि नागांनाही पकडण्यात हे लोक माहीर मानले जातात.
दिल्लीजवळ खेड्यात गारुड्यांना सर्पांच्या खेळाचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जायचे. परंतु आता वन्यप्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे गारुडी शहरातून तर ते दिसतच नाही. गावागावांतही हे प्रमाण अतिशय अल्प राहिले आहे.
सर्व ऐकल्यानंतर श्रद्धा हळूच आईला म्हणाली. मी गारुडीच्या हातात हात मिळवू का? संजयने आणि गारुडीने हे ऐकले, दोघेही हसले. संजय आपल्या मुलीला म्हणाला, हो, मिळव हातात हात. गारुडीने त्याची परडी पुढे केली. मुलांनी घाबरत घाबरत त्या परडीवरून हात फिरवला आणि गारुडीचा निरोप घेऊन पुढे गेली.