Tuesday, January 6, 2026
Homeराजकीयगौतम अदानी बारामती दौऱ्यावर; रोहित पवार बनले सारथी, तर शेजारी बसले अजितदादा

गौतम अदानी बारामती दौऱ्यावर; रोहित पवार बनले सारथी, तर शेजारी बसले अजितदादा

बारामती । Baramati

देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामती दौऱ्यावर असताना पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीत ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या केंद्राचे उद्घाटन केले. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक केंद्रासाठी अदानी समूहाने विशेष सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीत राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.

- Advertisement -

गौतम अदानी यांचे बारामती विमानतळावर आगमन होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. विमानतळावर अदानींना पाहताच अजित पवार पुष्पगुच्छ घेऊन पुढे सरसावले आणि ‘गौतमभाई, वेलकम टू बारामती’ अशी हाक मारून त्यांचे स्वागत केले. यावेळी उभय नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

YouTube video player

या स्वागताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अदानी यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील या दौऱ्यावर आले होते. विमानतळावरून कार्यक्रमाच्या स्थळी जाण्यासाठी अजित पवार, गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय एकाच गाडीतून रवाना झाले. विशेष म्हणजे, या गाडीचे सारथ्य आमदार रोहित पवार यांनी केले, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स’ या संस्थेच्या उभारणीत गौतम अदानी यांनी दिलेल्या निधीमुळे हा सोहळा पवार कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एकीचे दर्शन घडवत सुप्रिया सुळे यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांना गौतम अदानी यांचा सत्कार करण्यासाठी पुढे केले. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यासाठी पवार कुटुंबीयांनी एकत्र येत हा सोहळा पार पाडला.

उद्घाटनप्रसंगी बोलताना गौतम अदानी यांनी बारामतीच्या प्रगतीचे आणि शरद पवार यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. “बारामती हे केवळ एक शहर नसून ते प्रगतीचे प्रतीक आहे. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत शरद पवार यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे,” असे अदानी म्हणाले.

आगामी काळातील तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे कळीचे क्षेत्र ठरणार आहे. विद्या प्रतिष्ठानसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार ही केवळ एक सुरुवात असून, ही भागीदारी भविष्यातही कायम राहील. “इतिहास हा केवळ प्रेक्षक म्हणून पाहणाऱ्यांकडून घडत नाही, तर जे अपार मेहनत करतात तेच इतिहास रचतात,” अशा शब्दांत त्यांनी तरुणांना प्रेरणा दिली.

या केंद्राच्या माध्यमातून बारामती आणि परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. अदानींच्या या भेटीमुळे बारामतीच्या शैक्षणिक वैभवात नवी भर पडली असून, राजकीयदृष्ट्याही या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...