दिल्ली l Delhi
डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा सहा विकेट्सने पराभव केला. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार कोहलीला फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करता आली नाही. यावरून भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने कोहलीवर टीका केली आहे. तसेच गौतम गंभीरने विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहलीला आता कर्णधार पदावरुन हटवायला हवं. आठ वर्षापासून विराट संघाचा कर्णधार आहे. या आठ वर्षात त्यानं एकदाही संघाला आयपीएल जिंकून दिलेलं नाही. आठ वर्ष खूप जास्त आहेत, असं गंभीरनं म्हटलं आहे. गौतम गंभीर म्हणाला की, मला अशा कर्णधाराविषयी सांगा, कर्णधार सोडा अशा खेळाडूविषयी सांगा जो 8 वर्ष एखाद्या टीममध्ये आयपीएल जिंकल्याविना राहिला आहे. तसेच धोनीने ३ तर रोहित शर्माने ४ वेळा आयपीएल जिंकून दाखवले आहे. जर रोहितने ही कामगिरी केली नसती तर रोहितलाही कर्णधारपदावरून हटवण्यात आले असते. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी तत्त्वे वापरू नयेत, असे मत गौतम गंभीरने मांडले. दोन सीझननंतर यशस्वी कर्णधार आर. अश्विनला किंग्स इलेव्हन पंजाबने कर्णधारपदावरून हटवले होते, त्यामुळे ८ वर्षे हा कालावधी हा खूप मोठा आहे. आपण जर महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्याबाबतीत बोलत असू तर आपण विराट कोहलीबाबतीत का बोलत नाही? असा प्रश्न गंभीरने उपस्थित केला. सलग चार पराभवानंतरही केवळ नेट रानरेटच्या साहाय्याने RCB प्लेऑफसाठी क्वॉलिफाय झाली. पण तो संघ प्लेऑफसाठी तयारीचा संघ नव्हता असे मत गौतम गंभीरने मांडले. विजयाचे श्रेय जर कर्णधाराला जात असेल तर पराभवाची जबाबदारीसुद्धा कर्णधाराने आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, असेही गंभीरने नमूद केले.
दरम्यान, आयपीएल जिंकू न शकल्याची खंत व्यक्त करत विराट कोहलीनं आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. विराट कोहलीनं म्हटलं आहे ती, चाहत्यांची साथ आम्हाला मजबूत बनवते. आपल्या प्रेमासाठी आभारी आहे. आपण लवकरच भेटुयात असं त्यानं म्हटलं आहे. विराट कोहलीनं पराभवानंतर आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आम्ही एकमेकांसोबत होतो. आम्ही एका यूनिटप्रमाणं खेळलो आणि आमचा आयपीएलचा प्रवास चांगला राहिला. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे.