श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील मोरगेवस्ती परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एकास अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय पथकाने शिताफीने जेरबंद केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.29 नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत साहिल शकील पिंजारी (रा. मोरगेवस्ती वार्ड नं.07) हा व त्याचा साथीदार हे नॉर्दन ब्रँच चौक ते डावखर चौक जाणार्या रोडवर टॉवर चौक परीसरात (मोरगेवस्ती) येथे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आला असल्याची माहीती मिळाली.
तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे आदींचे पथकाने खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन पहाणी केली. त्यांना दोन इसम हे संशयितरीत्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांनी साहिल शकील पिंजारी व एक विधीसंघर्षीत बालक असल्याचे समजले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टाल व एक जिवंत काडतूस मिळुन आले.
त्यांच्याकडे आणखी विचारपुस केली असता सदर पिस्टल विक्रीसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल शकील पिंजारी (वय 23) यास अटक करण्यात आली असुन आरोपीवर आणखीही गुन्हे दाखल आहेत.




