अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान पार पडले. याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या रात्री एमआयडीसी पोलिसांनी शहरालगत असलेल्या दत्तनगर, वडगाव गुप्ता शिवारात मोठी कारवाई करत गावठी कट्टा व लोखंडी कोयते घेऊन दहशत माजवणार्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा, त्यातील एक जिवंत काडतूस तसेच तीन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.
बुधवारी (14 जानेवारी) सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, काही इसम हातात गावठी कट्टा व लोखंडी कोयते घेऊन दत्तनगर, वडगाव गुप्ता शिवारात दहशत निर्माण करत फिरत आहेत. ही माहिती मिळताच तत्काळ कारवाईचे आदेश देत पथकातील पोलीस अंमलदारांना संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चार ते पाच इसम हातात कोयते घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना जागीच ताब्यात घेतले.
हर्षद गौतम गायकवाड (वय 21, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता), वैभव गौतम गायकवाड (वय 19, रा. मुळाडॅम, वरवंडी, ता. राहुरी; सध्या रा. दुधडेअरी चौक, वडगाव गुप्ता), भूषण चंद्रकांत गाढवे (वय 22, रा. चांदा, ता. नेवासा; सध्या रा. इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, विळद घाट), मनजित मदनलाल किसाना (वय 24, रा. दुधडेअरी चौक, नवनागापूर), स्वप्निल व्यंकटेश म्हेत्रे (वय 21, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता) अशी त्यांची नावे आहेत. अंगझडतीत हर्षद गायकवाड याच्या कमरेला एक गावठी कट्टा व त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले.
तर वैभव गायकवाड, भूषण गाढवे व स्वप्निल म्हेत्रे यांच्या हातात तीन लोखंडी कोयते आढळून आले. सर्व हत्यारे पोलिसांनी जप्त केली असून गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार राकेश खेडकर, संदीप पवार, राजू सुद्रीक, सचिन आडबल, टेमकर, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव व अक्षय रोहोकले यांचा पथकाने ही कारवाई केली.




