Saturday, September 28, 2024
Homeक्राईमगावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार शिर्डीत जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार शिर्डीत जेरबंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात शनिवारी गणपती पॅलेस चौकात पोलिसांनी जीव धोक्यात घालून सराईत गुन्हेगार सुदर्शन वाणी याला गावठी कट्टा व जिवंत काडतूससह जेरबंद केले. आरोपी सुदर्शन वाणी याच्यावर जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र वाणी शनिवारी रात्रीच्यावेळी गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी सूत्र हलवत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना कारवाईचे आदेश दिले. कुंभार यांनी टीम घेऊन गणपती पॅलेस चौकात सापळा लावला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सुदर्शन वाणी हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु पोलीस निरीक्षक कुंभार, सह पोलीस निरीक्षक सागर काळे, पो.हे.कॉ. बाबासाहेब खेडकर, पो.कॉ. केवलसिंग रजपूत, पो.कॉ. सतपाल शिंदे, पो.कॉ. गरदास, पो.कॉ. घुले यांनी जीव धोक्यात घालून मोठ्या शिताफीने आरोपीचा पाठलाग केला व त्याला जेरबंद केले. आरोपीला जेरबंद केले त्यावेळी त्याच्याकडे गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले.

- Advertisement -

आरोपी राहाता तालुक्यातील साकुरी शिव येथील रहिवासी असून आरोपीने काही दिवसांपूर्वी शिर्डीत हातात कोयता व तलवार घेऊन दहशत निर्माण केली होती. मात्र तो गुन्हे करून फरार होत असे. सराईत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला सुदर्शन वाणीच्या शिर्डी पोलिसांनी मुसक्या जरी आवळल्या असल्या तरी त्याने कट्टा कुणाकडून विकत घेतला आणि त्या माध्यमातून कुणाचा घात करणार होता तसेच त्याचे कोण कोण साथीदार आहेत ही माहिती पोलिसांच्या तपासात लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. सध्या आरोपी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या विरोधात भारतीय हत्त्यार कायदा कलम 3/25, 7, व भा.दं.वि. 37 (1)(3) सह 135 या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिर्डी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे शिर्डीत परप्रांतीय गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याठिकाणी हॉटेल व लॉजिंग मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक गुन्हेगार याठिकाणी मजुरी करून याठिकाणी आश्रय घेतात. शिर्डीत दररोज साई भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या