संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्याच्या पठारभागातील घारगाव (Ghargav) येथील दोन चिमुकल्यांचा उलट्या होण्याच्या कारणातून दुर्दैवी मृत्यू (Unfortunate Death) झाल्याची घटना मंगळवारी (दि. 15) दुपारी घडली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात संगमनेर (Sangamner) तालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की घारगाव येथील गणेश नामदेव तांबे यांची मुले सोहम (वय साडेपाच वर्ष) व प्रज्ञेश (वय दोन वर्ष) हे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री जेवण करुन झोपी गेले होते.
मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. मोठा मुलगा सोहम याने वडिलांना त्रास होत असल्याचे सांगितले. त्यावर काही वेळाने छोटा मुलगा यालाही उलट्यांचा त्रास सुरू झाला. काहीवेळ दोघांनाही बरे वाटले. मात्र, दिवस उजाडताच दोघांनाही त्रास सुरू झाला. त्यानंतर घारगाव (Ghargav) येथील खासगी रुग्णालयात दोघांना उपचारार्थ हलविले. तेथून संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
तत्पूर्वी दोघांचे व्हिसेरा नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहरे यांनी सांगितले. याप्रकरणी वडील गणेश नामदेव तांबे यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेने ऐन सणासुदीच्या काळात पठारभागासह संगमनेर (Sangamnerतालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.