नेवासा |प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील घोडेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 5 वाहनांसह कत्तलीसाठी नेली जात असलेली 42 गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून दोघेजण पसार झाले आहेत. जनावरे व वाहनांसह पोलिसांनी 1 कोटी 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, बिरप्पा करमल, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, आकाश काळे, बाळसाहेब गुंजाळ, रवींद्र घुंगासे व उमाकांत गावडे यांच्या पथकाने सोनई पोलीस स्टेशन हद्दीत 17 जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घोडेगाव येथे छापा टाकला.
फिरोज रशीद शेख याचे राहते घराजवळ गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवल्याचे व दोन ट्रकमध्ये गोवंश जिवंत जनावरे भरताना दिसून आले व एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेले असताना मिळून आले. पथकाने घटना ठिकाणावरून निलेश रामकृष्ण शिंदे (वय 35) रा. उंबरगाव, ता.श्रीरामपूर, शाहरूख शमशुद्दीन शेख (वय 25) रा. घोडेगाव, ता. नेवासा, व भारत भाऊसाहेब शहाराव (वय 36) रा.फत्तेपूर ता. नेवासा या तिघांना ताब्यात घेतले.
सदरची जनावरे फिरोज रशीद शेख, रा. कृष्णानगर, घोडेगाव (फरार) व पापा कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही) रा.आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे (फरार) यांचे मालकीची असून त्यांचे सांगणेवरून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगितली.ताब्यातील आरोपी मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
पथकाने पंचासमक्ष अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (एमएच 23 एयू 5523), टाटा टेम्पो (एमएच 18 सीटी 4877), टाटा ट्रक (एमएच 16 एई 5484), मारुती सुझूकी वॅगनर कार (एमएच 05 बीएस 2898), मारुती सुझूकी अल्टो (ईयू 1937) व 42 गोवंशीय जनावरे असा 1 कोटी 2 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने वर नमूद आरोपीविरूध्द सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 230/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करत आहे.





