Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुलींच्या पहिल्या तुकडीसाठी एनडीए सज्ज

मुलींच्या पहिल्या तुकडीसाठी एनडीए सज्ज

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेत प्रथमच आता प्रशिक्षणासाठी मुली प्रवेश करणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा तयार करण्यात येत असून मुलींच्या पहिल्या तुकडीसाठी एनडीए सज्ज आहे. एनडीएमध्ये मुलींसाठी सध्या एक स्क्वॉड्रन उपलब्ध करण्यात येणार आहे. या स्क्वॉड्रनचे प्रशिक्षणासाठी आवश्‍य आणि विशिष्ट सुविधांनुसार नूतनीकरण करण्यात येत असल्याची माहिती एनडीए तर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यामुळे प्रशिक्षण संस्थेत मुलींसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण प्रणाली, महिला प्रशिक्षक अशा अनेक सुविधांच्या उपलब्धतेसाठी एनडीएमार्फत तयारी करण्यात येत असून सध्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. मुलींच्या विशिष्‍ट जीवनशैलीच्‍या आवश्‍यकता पूर्ण करण्‍यासाठी आवश्‍यक बदल देखील केले जात आहे. त्याचबरोबर दीर्घ कालावधीसाठी, केवळ मुलींसाठी स्वतंत्र स्क्वाड्रनची कल्पना केली जात असल्याचे एनडीएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

एनडीएमध्ये आतापर्यंत केवळ पुरुषांना तिन्ही सैन्य दलाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. यंदाच्या वर्षापासून साडेसोळा ते १९ वर्ष वयोगटातील मुलींना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) एनडीए लेखी परीक्षा, सर्व्हिस सिलेकशन बोर्ड मुलाखत आणि वैदकिय चाचणीद्वारे तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

येत्या जून महिन्यापासून एनडीएमध्ये महिला कॅडेट्सचे प्रशिक्षण सुरू होणार असून त्यांच्यासाठी सैन्यदलात १०, नौदलासाठी ३ आणि हवाईदलासाठी ६ अशा एकूण १९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्याच्या अभ्यासक्रमात किमान बदल करून शैक्षणिक, ड्रिल आदींचे प्रशिक्षण समान पद्धतीने दिले जाईल. महिला कॅडेट्ससाठी शारीरिक प्रशिक्षणात काही बदल होण्याची शक्यता आहे. असेही एनडीएने नमूद केले आहे.

तसेच मुलींच्या प्रशिक्षणासाठी सहायक स्टाफची ही नियुक्ती करण्यात आली आहे.बहुतांश प्रशिक्षण सराव हा पुरुष आणि महिलांचा एकत्रित होणार असून पुरुष तुकड्यांचे महिलाही नेतृत्व करू शकतील अशाप्रकारे प्रशिक्षण देण्यात येईल. सैन्य दलात दाखल होण्यासाठी आत्तापर्यंत चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी आणि हैद्राबाद येथील एअरफोर्स अकादमी, आयएनए एझीमाला याठिकाणी ज्याप्रकारे मुलींना प्रशिक्षित करण्यात येत होते त्याच पद्धतीने एनडीएत प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलींच्या जीवनशैलीनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या