नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला बॉक्सिंगच्या ५४ किलो वजनी गटात प्रीती पवार हिने सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या प्रीती पवार व जास्मिन लम्बोरिया यांनी ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाईकरून दिली आहे. आशियाई विजेती असलेल्या प्रीतीने आता कॉमनवेल्थ विजेतेपदाचाही मान पटकावला आहे.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष गटातील तब्बल १० बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्यापैकी प्रीतीने भारताला बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हरियाणातील भिवानी येथील प्रीतीने अचूक पंच आणि प्रभावी प्रतिआक्रमणाच्या जोरावर कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडो हिचा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
सामन्याच्या सुरुवातीपासून प्रीतीने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. तिन्ही फेऱ्यांमध्ये पाचही पंचांनी १०-९ असा गुण देत तिच्या बाजूने निकाल दिला आणि अखेरीस ३०-२७ असा निर्णय नोंदवला. प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्कारलेट सवाना डेलगाडोचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. संपूर्ण लढतीत प्रीतीने उत्कृष्ट संयम, उत्तम तंत्र आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. तिने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आणि अंतिम सामन्यात कॅनेडियन बॉक्सरचा पुनरागमनाचा प्रयत्न हाणून पाडला. हे भारताचे दिवसातील पहिले आणि बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक ठरले.
प्रीतीनंतर, जस्मिन लम्बोरियानेही ग्लासगोमध्ये आपल्या बॉक्सिंग कौशल्याची चुणूक दाखवली आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जस्मिन लम्बोरियाने उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्शचा ५-० असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. तिने यापूर्वी २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘लाइटवेट’ गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकलं होतं; हे तिचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरं पदक ठरलं. या दोन सुवर्णपदकांमुळे, या स्पर्धेत भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.




